एके दिवशी राजे पन्हाळ्याच्या मोहिमेवर असताना, नेताजी पालकर यांनी काही निवडक सैन्यांसोबत यायचे होते. परंतु जेव्हा नेताजी पन्हाळ्यावर पोहोचलो तेव्हा वेळ हाताबाहेर गेली होती, परिणामी राजे युद्ध हरले. राजांनी नेताजींना पत्र पाठवून कडक जाब विचारला, ‘समयासि कैसे पावला नाही?’ थोडक्यात काय वेळ ही फार महत्वाची असते. याच वेळेचं योग्य नियोजन केले नाही म्हणजे भविष्यातील गणिते चुकत जातात आणि आपल्याला त्याचा फटका बसतो. असाच वेळ चुकल्याने फटका बसतोय तो भारतीय इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना. एकीकडे शिक्षणाचा भार सहन होईना, दुसरीकडे शिष्यवृत्ती योजना लाभेना अशी दयनीय अवस्था अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची झाली आहे. हे प्रकरण नक्की काय आणि कोणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होतंय? याबद्दलचं आज आपण बोलणार आहोत.
◆ होता शिष्यवृत्तीचा आधार…
प्राथमिक शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. प्रत्येक भारतीयाला तो मिळायलाच हवा. प्राथमिक शिक्षण पूर्ण करून विद्यार्थी माध्यमिक आणि पदवीचे शिक्षण घेतात. हे पदवीचे शिक्षण म्हणजे अनेक कुटुंबाच्या खिशाला भार असते. त्यात ते जर अभियांत्रिकीचे शिक्षण असेल तर मग विषय थेट लाखात पोहोचतो. अभ्यास करण्याची तयारी मात्र आर्थिक विवंचना अशी परिस्थितीस सामोरे जाणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना आधार असतो तो ‘शिष्यवृत्ती’चा. आपल्या शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर ही मंडळी शिष्यवृत्ती योजनेचे पात्रता निकष पूर्ण करतात आणि त्यावर आपलं शिक्षण पूर्ण करतात. पण आता या शिष्यवृत्ती योजना आपल्या पदरी पाडून घेणं अनेक विद्यार्थ्यांना शक्यच होत नाहीये. करोनापूर्व परिस्थिती मात्र अशी नव्हती. शिष्यवृत्तीचा लाभ समस्त अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारी तरुणाई घेऊ शकत होती. पण व्यवस्थेच्या बिघडलेल्या नियोजनाने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचा आधार हरवत चालला आहे.
एकीकडे प्रवेश पूर्ण नाही. त्यामुळे शिष्यवृत्तीस मुकावे लागणार. दुसरीकडे उशिरा होणाऱ्या प्रवेशापायी अभ्यासाचा वाढता ताण.
◆ विद्यार्थ्यांचा वाली कोण?
यंदा जेईई मेन्स ही परीक्षा इंजीनियरिंग ऍडमिशन करता महत्त्वाची असते ही परीक्षा पहिल्या सेशन करिता २४ ते ३० जूनमध्ये आणि २५ ते ३० जुलै दरम्यान दुसऱ्या सेशन करता घेतली गेली. त्याचा निकाल लागला आठ ऑगस्टला. पुढे इंजिनिअरिंगच्या एन्ट्रन्स परीक्षा (सीईटी) ऑगस्टमध्ये घेण्यात आल्या. सप्टेंबर महिन्यात त्याचे रिझल्ट जाहीर झाले. महाराष्ट्रात इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाची दुसरी फेरीची अलॉटमेंट नुकतीच म्हणजे ३१ ऑक्टोबरला जाहीर करण्यात आली. आता सध्या तिसरी फेरी चालू आहे, पुढे कौन्सिलिंग राउंड होईल आणि त्याच्यानंतर कॉलेजेस सुरू होतील म्हणजे याला अजून साधारण महिन्याभराचा कालावधी लागणार हे निश्चित. मुळात कमीतकमी ऑगस्ट महिन्यात कॉलेजेस सुरू होणे अपेक्षित आहे. पण जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत आपल्याकडे एन्ट्रन्स परीक्षा सुरू होत्या. आणि आजही प्रवेश प्रक्रिया सुरू असल्या कारणास्तव कॉलेजेस सुरू झालेले नाहीत. आपल्या बाजूच्या गुजरात, कर्नाटक, राजस्थान या राज्यांत देखील कमीअधिक प्रमाणात हेच चित्र. याचा फटका अखेर बसणार तो गरजू विद्यार्थी वर्गाला. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती आपल्या अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची झाली आहे. एकीकडे प्रवेश पूर्ण नाही. त्यामुळे शिष्यवृत्तीस मुकावे लागणार. दुसरीकडे उशिरा होणाऱ्या प्रवेशापायी अभ्यासाचा वाढता ताण. करावे तर करावे काय? विद्यार्थ्यांचा वाली कोण? यांची उत्तरे निरूत्तरीत राहतात.
◆ विद्यापीठा थोर तुझा कारभार
आता पाहिलं सेमिस्टर हे दुसऱ्या सेमिस्टरच्या अभ्यासक्रम होण्याच्या काळात घेण्यात येनार असेल तर अभ्यासाचा भार वाढणे स्वाभाविक.
एन्ट्रन्स, ऍडमिशन यासाठी तब्बल एका सेमिस्टरचा वेळ वाया गेल्यामुळे, पुढच्या एका सेमिस्टरच्या कालावधी दोन सेमिस्टर घेतले जाते. त्याचा परिणाम विद्यार्थी आणि प्राध्यापक दोहोंवर होणार. प्राध्यापकांस तक्रार करता येत नाही, विद्यार्थी तक्रार करणार कुठे अशी आमच्या व्यवस्थेची अवस्था. त्यामुळे विद्यार्थ्यांवर परीक्षा काळात येणारा ताण अधिक असणार हे वेगळं सांगायला नको. शिवाय सबमिशनचा डोंगर डोक्यावर असतो तो वेगळा. शिक्षणाची पहिली साखळी चुकली म्हणजे त्याचा परिणाम फक्त दुसऱ्या सेमिस्टर पर्यंत मर्यादित राहत नाही. तो तिसऱ्या आणि चौथ्या सेमिस्टरपर्यंत कायम राहतो आणि या भरापायी विद्यार्थी पार गोंधळून जातो. नोव्हेंबर दरम्यान विद्यार्थ्यांच्या पहिल्या सेमिस्टरच्या परीक्षा असतात. सध्या अद्याप ऍडमिशन प्रक्रिया देखील पूर्णत्वास गेलेली नाही. त्यामुळे आज ‘विद्यापीठा थोर तुझा कारभार’ असचं म्हणावं लागेल.
◆ शिष्यवृत्ती योजना पाण्यात
जेके विद्यालक्ष्मी शिष्यवृत्ती – अंतिम तारीख १५ ऑक्टोबर २०२२ – शिष्यवृत्ती रक्कम ३०,००० रुपये, युनायटेड ब्रेवेरी लिमिटेड प्रगती शिष्यवृत्ती (मुलींकरिता) – अंतिम तारीख २९ सप्टेंबर २०२२ – शिष्यवृत्ती रक्कम ३०,००० रुपये, श्री बृहद भारतीय समाज शिष्यवृत्ती – अंतिम तारीख २६ ऑगस्ट २०२२, विद्याधन शिष्यवृत्ती (दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी) – अंतिम तारीख १८ ऑक्टोबर २०२२ – वाढीव अंतिम मुदत १५ नोव्हेंबर २०२२ – शिष्यवृत्ती रक्कम ६०,००० रुपये, रोटरी क्लब शिष्यवृत्ती – अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२२ – मोफत कर्ज योजना (निकाल नुकताच जाहीर) अशा अनेक शिष्यवृत्ती योजनांच्या अंतिम तारखाच निघून गेल्याने विद्यार्थ्यांना त्यावर पाणी सोडावं लागलं आहे. ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण हे अशा शिष्यवृत्ती योजनांवर असतं त्यांचं काय? आपल्या व्यवस्थेला त्यांची काळजी आहे का?
◆ ऑनलाईनला दिरंगाईचे ग्रहण
करोना आला आणि त्याने ऑनलाईन ओळख आणि आवश्यकता कळू लागले. या ऑनलाईनचा उद्देश वेळ आणि कष्ट दोहोंची बचत हा होता. पण अभियांत्रिकीच्या परीक्षा पहिल्या म्हणजे चित्र विपरीत दिसतं. वेळेची कष्ट कमी करणे राहिले बाजूला, वेळेची बचत हेही उद्धिष्ट गाठणे अवघड झालंय असं म्हंटल तर वावगे ठरू नये. करोना नियंत्रणात येऊन एका वर्षाहून अधिक काळ लोटला व्यवस्था मात्र अद्याप नियंत्रित आहे असं म्हणता येत नाही. एंट्रन्स परीक्षांच्या ऑगस्ट महिन्यामधील तारखा बघता परीक्षांचा निकाल लवकरात लवकर जाहीर होणे अपेक्षित होते, जेणेकरून प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होईन कॉलेजेस लवकरात लवकर सुरू होतील. पण ऑनलाईन घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल सप्टेंबर मध्ये लागला.
ही परिस्थिती बदलणार तरी कधी?
आज अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची व्यथा मांडण्याचं कारण एवढंच, की भारत हा इंजिनिअर तरुणांचा कारखाना झालाय हे एव्हाना उभ्या जगाला कळुन चुकलं आहे. यास सर्वोतोपरी शिक्षण व्यवस्था हीच जबाबदार आहे असं म्हणतां येणार नाही पण या नाचक्कीतील शिक्षण व्यवस्थेचा वाटा मोठा नक्कीच आहे. या अशा प्रसंगाने त्याची परिस्थिती दिवसेंदिवस खालावतच चालली आहे असे जाणवते. यानिमित्ताने प्रश्न पडतो तो असा, की ही परिस्थिती बदलणार तरी कधी?