वरील बिल गेट्स आणि त्याचं वाक्य आपण वाचलं आहेच. आता त्याच अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ‘मी परीक्षेत काही विषयांत अनुत्तीर्ण झालो, पण माझा मित्र मात्र सर्वात उत्तीर्ण झाला. आज तो मायक्रोसॉफ्टमध्ये अभियंता आहे आणि मी मायक्रोसॉफ्टचा मालक’. अर्थ तसा साधा आहे पण त्याचा अनर्थ कधी होतो हे जाणून घेण्यासाठी हा थ्रेड.
काहींनी (यात ‘काहींनी’ याचा अर्थ जे परीक्षेत अनुत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण होण्याच्या पातळीवर आहेत अशी मंडळी) बिल गेट्स यांच्या वरील वाक्यावर ‘परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक नाही, आयुष्यात होणे आवश्यक आहे’ अशी सर्वसाधारण प्रतिक्रिया देतील. ती चुकीची आहे असंही नाही. मात्र ती परिपूर्ण नक्कीच नाही. शिक्षण दुय्यम असतं, तर राईट्स बंधूद्वारे मानवाला पंख लाभलेच नसते. एडिसनने हे जग प्रकाशमय केलेच नसते. आर्य भट्टांनी शून्याचा शोध लावला नसता.
‘वरील वाक्यातून बिल गेट्सना यश आणि अपयश याचं महत्त्व अधोरेखित करायचं होतं’ असा व्यापक विचार समाजातील सुज्ञ मंडळी नक्कीच करतील. शिक्षण या शब्दाचा अर्थच मुळी ‘शिक-क्षण’ क्षणा क्षणाला शिकणे असा आहे. फरक फक्त एवढाच आहे, ज्या ज्या वेळी परीक्षेचे परिणाम ‘अनुत्तीर्ण’ या शेऱ्याने रंगवण्यात आले असतील तेव्हा खचून जाऊ नये. कारण एखादी परीक्षा अनुत्तीर्ण होणे म्हणजे आयुष्य संपुष्टात येणे नव्हे, तर ती संधी देखील असू शकते.
परीक्षेतील गुण हे तुमच्या संपूर्ण आयुष्याचे प्रगतीपुस्तक नसतात एवढंच आपण लक्षात ठेवावं. तसेच शिक्षण वा परिक्षेला ‘दुय्यम’ ठरवणे म्हणजे आपला कमीपणा झाकण्यासारखे आहे. दुय्यम जर काही असेलच तर ते त्या परीक्षेतील ‘यश किंवा अपयश’ असावं. शिक्षण असो वा परीक्षा या दोन्ही जीवनातील अविभाज्य भाग आहेत आणि त्या असायलाच हव्या.