जैविक रंगांचा ध्यास

रासायनिक रंग, ते तयार करताना होणारे प्रदूषण, हे रंग त्वचेच्या संपर्कात आल्यास त्यातून उद्भवणारे आजार याविषयी आपण बऱ्याचदा वाचतो, ऐकतो आणि याची जिवंत उदाहरणे देखील अनुभवतो. पण तेच रंग अगदी माती, पाणी किंवा अगदी हवा यांच्यापासून तयार करता आले तर? डॉ. वैशाली कुलकर्णी या हीच कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सध्या संशोधन करत असून त्या केबीकोल्स सायन्स प्रायव्हेट लिमिटेड (KBCols Sciences Pvt. Ltd.) या कंपनीच्या संस्थापक आणि सीईओ आहेत. त्यांचा स्टार्टअप विश्वातील प्रवास आपण आजच्या ‘जागर नवदुर्गांचा’ या उपक्रमातून जाणून घेणार आहोत.

डॉ. वैशाली यांचे शालेय शिक्षण डोंबिवलीमध्ये झाले, तर पुढे बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी मुलुंड येथे घेतले. वैशाली यांचे मोठे बंधू यांनी फार्मसीचे शिक्षण घेतलेले आहे. वैशाली या अकरावी-बारावीमध्ये शिकत असताना घरी त्यांना त्यांच्या मोठ्या भावाकडून फार्मसीमधील संशोधनाविषयी माहिती मिळत असे. त्यातूनच त्यांना फार्मसी या क्षेत्राबद्दल आकर्षण निर्माण झाले. त्यांनीसुद्धा फार्मसीचा अभ्यास करायचे ठरवले आणि सानपाडा येथील ओरिएंटल कॉलेज ऑफ फार्मसीमधून त्यांनी २००९ साली त्यांचे बी.फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले. वैशाली यांचे वडील हे मेकॅनिकल इंजिनीअर असून त्यांच्या आई गृहिणी आहेत. महिलांना त्यांचा आयुष्यात स्वतंत्र व्हायचे असेल, तर त्यांनी जास्तीत जास्त शिक्षण घेणे आवश्यक आहे, असे त्यांचे वडील त्यांना सांगत असत. त्यामुळे आपल्या दोन्ही मुलींनी कमीतकमी पीएचडीपर्यंतचे शिक्षण घ्यावे, असे त्यांचे स्पष्ट मत होते आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन वैशाली यांनीदेखील उच्चशिक्षणाचा मार्ग स्वीकारण्याचे ठरवले. त्याकाळात वडिलांचा भक्कम पाठिंबा असल्यामुळे पुढे गेटची परीक्षेत यशस्वी होऊन त्यांनी केमिकल टेक्नॉलॉजी या क्षेत्रात जगभरात नावाजल्या गेलेल्या मुंबईतील माटुंगा येथील ‘इन्स्टिटयूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT)‘ या संस्थेमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळवला. कालांतराने त्यांनी त्याच संस्थेतून पीएचडीचे शिक्षणसुद्धा पूर्ण केले. त्यांच्या जुळ्या बहिणीनेसुद्धा ह्याच कॉलेजमधून पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले असून केवळ घरच्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे आम्ही दोघीजणी हे उज्वल यश प्राप्त करू शकलो, असे वैशाली आवर्जून नमूद करतात.

वैशाली यांनी पीएचडी पूर्ण झाल्यावर भारत सरकारच्या ‘बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टंस कौन्सिल’ (Biotechnology Industry Research Assistance Council (BIRAC)) या संस्थेकडे फायनान्शियल ग्रांटसाठी (Financial Grant) अर्ज केला होता. जास्त जोखीम आणि समाजाला उपयोगी पडतील अशा नाविन्यपूर्ण प्रॉडक्ट्ससाठी आवश्यक असलेल्या संशोधनासाठी हे अर्थसहाय्य दिले जाते आणि त्यासाठी ठराविक निवड प्रक्रिया पार पाडावी लागते. या अर्थसहाय्यासाठी वैशाली यांची निवड झाली. मात्र हे अर्थसहाय्य थेट संशोधकाला देण्याऐवजी त्याच्या कंपनीला देण्यात येत असल्याने वैशाली यांना कंपनी सुरु करणे आवश्यक होते आणि त्यातूनच ‘केबीकोल्स सायन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या त्यांच्या स्टार्टअपचा जन्म झाला आणि कालांतराने त्यांनी जैविक रंगांचे ‘प्रोटोटाईप‘ तयार केले. त्यानंतर बीआयआरएसीया संस्थेच्याच आणखी एका अर्थसहाय्य योजनेसाठी त्यांनी अर्ज केला आणि निवड प्रक्रिया पार करत पुन्हा एकदा त्यांना हे अर्थसहाय्य उपलब्ध झाले. त्यातून त्यांनी ‘प्रोटोटाईप’वर आणखी संशोधन केले. आता त्यांचे प्रॉडक्ट्स हे संशोधनाच्या अंतिम टप्प्यात (Pilot Phase) मध्ये असून, विविध कंपन्यांसोबत त्या या जैविक रंगांचे ट्रायल्स घेत आहेत. ॲमस्टरडॅम मधील ‘फॅशन फॉर गुड’ या वस्तुसंग्रहालयामध्ये झालेल्या एका प्रदर्शनामध्ये हूल ले केस (Hul Le Kes) या फॅशन डिझायनरने डॉ. वैशाली यांनी तयार केलेल्या रंगांचा वापर केला होता. तसेच २०२२ मध्ये झालेल्या ‘लॅकमे फॅशन विक’मध्ये डॉ. वैशाली यांनी तयार केलेले रंग वापरून बनवलेली वस्त्रे परिधान करून काही मॉडेल्स सहभागी झाल्या होत्या. डॉ. वैशाली कुलकर्णी यांच्या या संशोधनाच्या क्षेत्रातील स्टार्टअपला ‘मॅक्झिमा‘ परिवाराकडून शुभेच्छा!

जैविक रंगांविषयी थोडेसे:
सध्या नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी वनस्पती किंवा भाज्या यांचा वापर केला जातो. मात्र त्यांच्या काही मर्यादा असतात. त्यामुळे त्यावर मात करण्यासाठी, नैसर्गिक रंगांचा औद्योगिक क्षेत्रात वापर करण्यासाठी डॉ.वैशाली यांनी ‘मायक्रोबिअल कलर्स’वर संशोधन आणि त्यांची निर्मिती केली आहे. त्यासाठी विविध नैसर्गिक घटकांचे सॅम्पल्स प्रयोगशाळेत आणून त्यांच्यावर प्रक्रिया केली जाते. त्यातून तयार होणाऱ्या रंगाची उपयुक्तता तपासली जाते. मुख्य म्हणजे सॅम्पल्स हाती आल्यावर त्यातून कोणता रंग तयार होणार आहे, याची स्पष्ट कल्पना नसते. त्यामुळे संयम राखून हे संशोधन करावे लागत असल्याचे डॉ. वैशाली सांगतात.