स्टार्टअपचा इनोव्हेटिव्ह मार्ग

भारत हा कृषीप्रधान देश मनाला जातो. असे जरी असले, तरी जागतिक बाजारपेठेत भारतीय शेतकरी कुठेही दिसत नाही. यामागे अनेक कारणे आहेत. यातील एक कारण म्हणजे, तंत्रज्ञानाविषयी असणारे त्याचे अपुरे ज्ञान. आपला शेतकरी आजही त्याच पारंपरिक पद्धतीला चिटकून आहे. हेच कारण असावं देशातील दुसऱ्या क्रमांकाचा कांदा उत्पादक जिल्हा महाराष्ट्रात असतानाही, तोच कांदा त्याच शेतकऱ्यांना रडवतो. कांदा खराब होऊ लागला याची माहिती शेतकऱ्याला योग्यवेळी मिळत नाही, परिणामी सगळाच्या सगळा कंदाच खराब होऊन जातो. या समस्येवर समाधान शोधत आपला स्टार्टअप उभा केला आहे नाशिकच्या लालस गावच्या ‘कल्याणी शिंदे‘ यांनी. कल्याणी शिंदे यांचा स्टार्टअपमधील उत्पादन शेतकऱ्यांना योग्यवेळी खराब होऊ लागलेल्या कांद्याची माहिती देतं. परिणामी होऊ घातलेले नुकसान कमी करण्याची संधी शेतकऱ्याला मिळते.

कल्याणी शिंदे या सर्वसामान्य कुटुंबात लहानाच्या मोठ्या झाल्या. वडील शेतकरी पण शेतीतून मिळणारे नगण्य उत्पन्न पाहता त्यांनी शेतीसह इलेक्ट्रॉनिकचं आपलं दुकान थाटात. आई गृहिणी तरीही काही ना काहीतरी करण्याच्या धडपडीत. शिक्षण घेणारे दोन लहान भावंडे अशा सर्वसाधारण कौटुंबिक गोतावळ्यात त्या मोठ्या झाल्या. घरातील थोरल्या म्हणून जबाबदऱ्यांची जाणीव त्यांना वेळोवेळी घडत गेली. त्यामुळे मेहनत करून, चांगलं शिक्षण घेऊन एखादी चांगली नोकरी बघायची हेच त्यांचं स्वप्न होतं. त्यासाठी इंजिनिअर व्हायचं त्यांनी ठरवलं. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये असताना मात्र त्यांना आपण ‘नाईन टू फाईव्ह’साठी बनलो नाही, याची जाणीव त्यांना झाली. पण नाईन टू फाईव्हला पर्याय काय? याचं उत्तर काही गवसत नव्हतं. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात असताना त्यांचा संबंध आला तो टाटा कन्सल्टन्सीच्या डिजिटल इम्पेक्ट स्वेअरसोबत आणि त्यांच्या करिअरची दिशा आणि दशा दोन्ही बदलून गेली. इथे इंटर्नशिप करताना समाजातील समस्या त्यांच्या समोर येऊ लागल्या. स्वतः शेतकरी कुटुंबातून पुढे येत असल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या प्रामुख्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये संधी दिसत गेली. नाशिकला मार्च-मे महिन्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उन्हाळी उत्पादन होते. कधी कधी भाव चांगला न मिळाल्याने शेतकरी हा कांदा साठवून ठेवतात. हवेच्या अद्रतेमुळे आणि योग्य तापमान न मिळाल्याने काही दिवसात कांदे खराब होण्यास सुरु होते. आणि शेतकऱ्यांना काही करायला मार्ग उरत नाही आणि त्यामुळे त्यांचं मोठं नुकसान होते. याच सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी कल्याणी शिंदे यांनी ‘गोदाम इनोव्हेशन‘ची स्थापना केली. गोदाम इनोव्हेशनच्या माध्यमातून असे यंत्र तयार केले गेले, जे साठवलेला कांदा खराब होण्याची प्रक्रिया सुरु झाल्यावर त्यातून निघणाऱ्या वायूला डिटेक्ट करते. त्यामुळे शेतकऱ्यांना या बाबतीत आगाऊ सूचना मिळते. आणि होणारे नुकसान टाळता येते.

गोदामची कल्पना जेव्हा त्यांनी मांडली तेव्हा त्यांना खूप समस्या तोंड द्यावे लागले. समस्या घरातून सुरू झाल्या होत्या. सुरुवातीला कुटूंबाला विश्वासात घ्यायला वेळ लागला. पण ‘कॅल्क्युलेटेड रिस्क’ पटवून दिली आणि घरच्यांनी देखील कल्याणी यांच्या स्वप्नांना हिरवा कंदील दिला. इतर कुटुंबीय मात्र ‘हे काय आपलं काम आहे का? चांगली नोकरीच कर हे काही आपलं क्षेत्र नाही? यशस्वी होणार का?’, असे एक न अनेक प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर उभे केले. पण गुरूंचा सल्ला आणि कुटुंबाचा पाठिंबा असला म्हणजे असे हजारो प्रश्न निकालात काढता येतात हे कल्याणी यांनी दाखवून दिले.

संकटांना पुरून उरावे
एक उद्योजिका म्हणून वावरत असताना संकटे येणं हे स्वाभाविक आहे. तुम्ही त्यांना सामोरं कसं जाता हे महत्त्वाचं. कल्याणी यांनाही अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. अवघ्या पंधरा दिवसावर आलेलं प्रॉडक्ट लौंचिंग, त्यांना करोना मुळे करता आलं नाही. पर्यायाने येणारं उत्पन्न ठप्प झालं. अशावेळी खचून न जाता त्यांनी आपल्या प्रोडक्टवर काम करण्याची तयारी दाखवली आणि आपलं प्रॉडक्ट अधिक मार्केट सॅव्ही करण्यावर भर दिला. ऐन उमेदीच्या काळात सह-संस्थापकाने माघार घेतली. अशा प्रसंगी त्यांनाही शस्त्र टाकता आले असते, पण तसं न करता याही संकटाला त्या पुरून उरल्या. हे सर्व करत असताना त्यांचा फोकस कधीच ढळला नाही. यशस्वी होतोय हे दिसू लागलं की आपण लगेच हुरळून जातो. याच धुंदीत चुकीचे निर्णय घेतो. कल्याणी शिंदे मात्र संयमित राहिल्या. त्यामुळे त्या सांगतात, ‘मी एकावेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केले. कांद्यासाठी यंत्र बनवताना लगेच दुसऱ्या पिकांसाठी विचार करण्यास सुरुवात केली नाही. भविष्यात नक्कीच आम्ही विचार करू पण त्यासाठी कांद्याच्या क्षेत्रात आम्हाला यशाचे शिखर गाठायचे आहे.’

Kalyani Shinde with Farmer

समाधानी चेहऱ्यांचं समाधान
आमच्या डिव्हाइसमुळे शेतकऱ्यांना योग्यवेळी खराब कांद्याचा शोध घेता आला. यामुळे होणारं नुकसान टाळता येऊ लागलं. साहजिकच याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होतं. ‘शेतकऱ्यांना आमच्या माध्यमातून मदत होतेय हे आमच्यासाठी यशाचं प्रतीक राहिलं आहे. आपला हेतू सार्थकी लागल्यानं आम्हालाही यातून समाधान मिळत गेलं. येत्या काळात आम्हाला अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचं आहे.’ असं कल्याणी आवर्जुन सांगतात.

‘अयशस्वी होण्याची हीच योग्य वेळ’
होय, कल्याणी यांनी तरुणांना हेच सांगताहेत. ‘तरुणांनो अयशस्वी व्हा. अयशस्वी होण्याची हीच योग्य वेळ आहे. आज तरुणांकडे जबाबदाऱ्या कमी आहेत. शिवाय अयशस्वी होण्यासाठी वेळ आहे. अयशस्वी झाल्यावर त्यातून सावरण्यासाठी संधी आहे. आज अयशस्वी झालात तर त्यातून शिकाल आणि उद्या यशस्वी व्हाल. यश हे एका रात्रीत मिळत नाही त्यासाठी अपयशाचे उंबरठे झिजवावे लागतात. त्याची तयारी ठेवायला हवी.

-वैष्णवी संजय