आयुष्यात अनेक चढ – उतार येत असतात. या प्रवासात खचून न जाता चिकाटी, कष्ट करण्याची तयारी आणि जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी असंख्य उदाहरणे आहेत. त्यात स्त्रिया या आयुष्यात असणाऱ्या अनेक समस्यांशी दोन हात करत एकहाती विजय मिळवताना आपल्याला पाहायला मिळतात. स्त्रियांच्या आयुष्यातील मासिक पाळी हा तसा कठीण काळ मात्र या काळातही अनेक समस्यांना तोंड देत त्या आयुष्यात लढत असतात. याकाळात आरोग्य हा सर्वात महत्त्वाचां मुद्दा स्त्रियापुढे असतो. त्यांच्या याच समस्येवर रामबाण उपाय काढत एका स्त्रीनेच त्यांचा त्रास कमी केला आहे. पुण्याच्या सारिका पाठक यांनी सध्याच्या मासिक पाळीच्या स्वच्छता उत्पादनांमुळे उद्भवणारे आरोग्य, पर्यावरण आणि विल्हेवाट या समस्या सोडवणारे प्रोडक्ट तयार केले आहे. त्यांनी गरम पाण्यात विल्हेवाट लावता येतील असे सॅनिटरी नॅपकिन्स विकसित केले आहेत. आणि याच आधारावर स्वतःचा ‘क्रेसा ग्रीनटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ हा स्टार्टअप त्यांनी सुरू केला.
स्त्रियांच्या अनेक समस्यापैकी मोठ्या असणाऱ्या या समस्येचं समाधान शोधणं आणि त्याचा स्टार्टअप मध्ये रुपांतर करण हा प्रवास सोपा मुळीच नव्हता. अनेक चढउतार पार केल्यानंतर सारिका यांनी हा शोध लावून स्वतःचा स्टार्टअप ही उभा केला. सारिका यांनी पुणे विद्यापीठाच्या एमआयटी कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. अभियांत्रिकी नंतर लगेचच त्यांना कॅम्पस प्लेसमेंट मिळाली आणि त्या इमर्सन येथे डिझाईन अभियंता म्हणून नोकरी करू लागल्या. सारिका या नोकरीत बऱ्यापैकी स्थिर झाल्या, कमवू लागल्या. पण त्यांच्या मनात नेहमी मास्टर्स करायची इच्छा होती. म्हणून त्यांनी TOEFL आणि GRE ची तयारी केली . करिअरच्या उच्च टप्प्यावर असताना लग्न झाले. लग्नानंतर अनेकांच्या करिअरला ब्रेक लागतो. मात्र सारिका यांना खूप आधार देणारे पती लाभले. विशेषतः सासुबाई सौ. सुनीता पाठक यांचे सर्वतोपरी प्रोत्साहन मिळत राहिले. यामुळेच त्या लग्नानंतर उच्च शिक्षणासाठी एकट्या अमेरिकेत जाऊ शकल्या.
फिलाडेल्फिया युनिव्हर्सिटीमधून इंडस्ट्रीयल डिझाईनमध्ये मास्टर्स करत असतानाच, स्त्री स्वच्छता उत्पादनाच्या क्षेत्रातील त्यांचा प्रवास सुरू झाला. याकाळात त्यांचा जॉन्सन आणि जॉन्सनच्या उद्योग प्रायोजित प्रकल्पाशी संपर्क आला. या कंपनीला स्त्री स्वच्छता उत्पादनात काही नाविन्य हवे होते. सध्याच्या स्त्री स्वच्छता उत्पादनामध्ये नावीन्य आणणे आणि या संदर्भात वापरकर्त्यांचा ग्राहक म्हणून अनुभव वाढवणे हा त्यांचा मूळ उद्देश होता. सारिका यांनी डिझाईन इंजिनिअर म्हणून उत्पादनाच्या सौंदर्याचा आणि देखाव्यावर काम केले आणि गोलाकार आकाराच्या पॅन्टीलिनरचा शोध लावला. ज्याचे जॉन्सन अँड जॉन्सन यांनी केलेल्या डिझाइन पेटंट अर्जामुळे कौतुक झाले. या मोठ्या यशामुळे याच क्षेत्रात पुढे आणखी मेहनत घेऊन काम करण्याची प्रेरणा सारिका यांना मिळाली. सारिका सांगतात या प्रकल्पाचा सर्वात चांगला भाग म्हणजे त्यांना स्त्रीविषयक स्वच्छता उत्पादनाचा बारकाईने अभ्यास करण्याची संधी मिळाली
भारतात परत आल्यानंतर, त्यांनी याच अमेरिका स्थित कंपनीत १ वर्ष कार्य केले. मात्र बाळंतपण आणि कुटुंबाच्या जबाबदारीमुळे त्या तिथे परत जाऊ शकल्या नाही. त्यामुळे शेवटी नोकरी सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पुन्हा करिअरच्या सर्वोच्च पदावर असताना सारिका यांनी असा निर्णय घ्यावा लागला. अस जरी असलं तरी एकीकडे आई म्हणून जबाबदारी वाहताना संशोधन आणि वाचन क्षेत्राकडे त्यांची पाठ फिरवली नाही.
या काळात सारिका एका स्टार्टअपमध्ये सामील झाल्या. जे त्याच मासिक पाळीच्या स्वच्छता उत्पादनांवर आणि त्याच्या समस्येवर काम करत होते. जिथे त्यांना स्टार्टअप कल्चर समजून घेण्याचा जवळून अनुभव आला कारण यापूर्वी त्यांनी फक्त कॉर्पोरेट नोकऱ्यांमध्ये काम केले होते. या विषयावर आणि भारतातील समस्यांबद्दल खूप संशोधन करण्याची संधी त्याना तिथे मिळाली. तेथे त्या सॅनिटरी नॅपकिनच्या विल्हेवाटीच्या समस्येचे निराकरण करण्याचे काम करत होत्या. याच काळात त्यांनी स्वतःला असा प्रश्न केला की विल्हेवाट लावण्याच्या व्यवस्थेत काही पर्याय शोधण्याऐवजी आपण सॅनिटरी नॅपकिनमध्येच सहज विल्हेवाट लावण्यात नावीन्य आणले तर काय होईल? हाच प्रश्न क्रेसाच्या जन्मास कारणीभूत ठरला.
गेल्या वर्षीच्या सुमारास जेव्हा त्यांनी ही संकल्पना मांडली. तेव्हा त्यांनी दोन्ही संकल्पनेचे तात्पुरते पेटंट दाखल केले आणि मॉकअपवर काम सुरू केले. हा प्रकल्प कसा पुढे नेता येईल ? ही कल्पना पुढे कशी आणता येईल? यावर त्यांनी खूप विचार केला.
कारण सारिका यांना व्यावसायिक पार्श्वभूमीचे कुटुंब नव्हते. त्यांनी त्यांची ही संकल्पना घेऊन पुणे येथील सीओइपी (कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग) भाऊ संस्थेशी संपर्क साधला. या संस्थेला सारिका यांची संकल्पना आवडली आणि त्यांनी येथे त्यांचे त्यांचे काम सुरू केले.
भाऊ इन्स्टिट्युट येथे incubation घेतल्यानंतर त्यांच्या स्टार्टअपने खऱ्या अर्थाने आकार घ्यायला सुरुवात केली. (स्टार्टअप इनक्यूबेटर हा स्टार्टअप कंपन्यांसाठी एक सहयोगी कार्यक्रम आहे — सामान्यत: भौतिकरित्या एका मध्यवर्ती कार्यक्षेत्रात स्थित — स्टार्टअप्सना त्यांच्या बाल्यावस्थेत वर्कस्पेस, सीड फंडिंग, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देऊन यशस्वी करण्यात मदत करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.) सारिका यांना स्टॅनफोर्ड सीड स्पार्क प्रोग्राम सारख्या विविध प्लॅटफॉर्मवर त्यांना एक्स्पोजर मिळाले जिथे क्रेसाने तिसरे स्थान पटकावले. स्टार्टअप साठी (फंड) आर्थिक मदत मिळवण्यासाठीही सारिका यांना अनेक परीक्षा द्यावा लागल्या. नंतर सीओईपीने स्टार्टअप्सना सतत विविध निधीच्या संधी उपलब्ध करून दिल्या ज्यातून त्यांना DITC कॉर्पोरेट फंड, निधी प्रयत्न निधी अनुदान स्वरूपात मिळाला अस सारिका सांगतात. या अनुदानांमुळे त्यांना स्टार्टअप संकल्पनेपासून ते प्री पायलटपर्यंत सतत मार्गदर्शन आणि मार्गदर्शनाद्वारे निधी आणण्यात मदत झाली. या स्टार्टअपला विविध प्लॅटफॉर्मवर एक्सपोजर मिळाले. त्यानंतर सारिका यांना त्यांच्या स्वत:च्या अभियांत्रिकी महाविद्यालय, MIT TBI येथे incubation घेण्याची संधी मिळाली. त्यांच्या स्टार्टअपला आकार देण्यात MIT ने मार्गदर्शनाने आणि पाठिंब्यानेही चांगली भूमिका बजावली.
सतत संशोधन आणि विकास, प्रयोग आणि पुनरावृत्तीनंतर, २०२२ मध्ये पहिला प्रोटोटाइप तयार केला आणि तेव्हापासून आम्ही सतत वापरकर्त्यांचा अभिप्राय, प्रमाणपत्रे घेत आहोत आणि उत्पादन आणि त्याची गुणवत्ता सुधारत आहोत असे सारिका सांगतात. क्रेसाने पुण्यातील विविध प्लॅटफॉर्म आणि वसतिगृहांमध्ये पायलट आणि फीडबॅक सत्र आयोजित केले. आता क्रेसा उत्पादनाच्या स्टेजवर किंवा प्री-लाँचमध्ये आहे. सारिका सांगतात की लवकरच आम्ही www.cresgreentech.com या वेबसाइटवर त्यानी संशोधनं केलेलं सॅनिटरी नॅपकिन लॉन्च केलं जाणार आहेत.आमचे उत्पादन ॲमेझॉन, फ्लिपकार्ट इत्यादी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध असेल.
या प्रवासात वडील, तसेच सासरे, पती, कुटुंबातील सर्व सदस्यांचा, विशेषत: पालकांचा खूप चांगला पाठिंबा मिळाला असल्याने मी हे करू शकले अस सारिका प्रतिपादन करतात. सारिका कामावर असताना त्यांच्या मुलाची काळजी त्यांचं कुटुंब घेत. यामुळेच मी माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकले अस त्या सांगतात. प्रत्येक महिला उद्योजकाला यशस्वी होण्यासाठी हा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे असे त्यांना वाटते. ध्येय ठेवून जिद्दीने, चिकाटीने, दृढ निश्चयाने काम केलं की नक्की यश मिळत अस सारिका सांगतात. आपल्या रोजच्या जगण्यात आजही अनेक समस्या आहेत. त्या समस्यांच निराकरण करा. तरच तुमचं स्टार्टअप यशस्वी होईल. हाच यशाचा कानमंत्र आहे अस सारिका म्हणतात.
◆ सॅनिटरी एक समस्या:
सारिका यांना संशोधनातून त्यांना जाणवले की सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट ही भारतातील वाढती समस्या आहे. मुख्य कारण म्हणजे त्यातील रासायनिक आणि प्लास्टिक सामग्री. भारतात दरवर्षी १२ अब्ज सॅनिटरी नॅपकिन्स वापरले जातात. ज्याची योग्यरित्या विल्हेवाट लावावी लागते. दिवसातील केवळ चार ते पाच तास वापरल्या जाणाऱ्या सॅनिटरी नॅपकिन संपुर्ण नष्ट होण्यासाठी ८०० वर्षे लागतात. याचे बायोडिग्रेड करणे फार कठीण आहे. यामुळे वर्षानुवर्षे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची कल्पनाही करण कठीण आहे. सर्वेक्षणानुसार, २८ टक्के सॅनिटरी पॅड्सची विल्हेवाट लावताना त्याला नेहमीच्या कचऱ्यात फेकले जाते. पुनर्वापराच्या दृष्टीने, सॅनिटरी नॅपकिनचा कचरा दररोज वेस्ट पिकरद्वारे माणसांकडून वेगळा केला जातो. या पॅडला हाताने स्पर्श केल्याने कचरा वेचणाऱ्या लोकांना अनेक रोगकारक जीवाणूंचा सामना करावा लागतो, जे त्यांच्या आरोग्यासाठी चांगले नाही. यापैकी बहुतेक सॅनिटरी नॅपकिन्स लँडफिल आणि पाण्यात टाकले जातात. यापैकी काही पॅड जळतात परंतु त्यातून निघणारा धूर हा अत्यंत घातक आणि कर्करोगजन्य असतो. त्यामुळे सारिका यांना जाणवले की या विषयाशी संबंधित अनेक समस्या आहेत.
◆ क्रेसा काय करते ?
‘क्रेसा’ (Cresa) म्हणजे सर्जनशील स्वच्छता. सारिका यांनी असे सॅनिटरी नॅपकिन्स विकसित केले आहेत जे १०० टक्के बायोडिग्रेडेबल, रसायनमुक्त, पाण्यात विरघळणारे आणि सध्याच्या बाजारातील उत्पादनाशी स्पर्धात्मक आहेत. हे जगातील पहिले गरम पाण्यात विरघळणारे सॅनिटरी नॅपकिन आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेले सॅनिटरी पॅड, ज्यांचे विघटन होण्यास ८०० वर्षे लागतात, याचा विचार करून, क्रेसाने सॅनिटरी पॅड विकसित केले आहेत जे गरम पाण्यात ८० सेकंदात विरघळतात आणि शौचालयात फ्लश केल्यानंतर, सांडपाणी प्रणालीमध्ये एक महिन्याच्या आत नैसर्गिकरित्या विघटित होतात. हे सॅनिटरी पॅड तयार करताना सुरुवातीची समस्या केवळ पर्यावरणाचीच नव्हती तर आरोग्याचीही समस्या होती. सॅनिटरी नॅपकिन्स पेट्रोलियम आधारित उत्पादनापासून बनलेले असतात. यामुळे त्वचेची जळजळ आणि पुरळ येतात, खूप खाज सुटते, अस्वस्थ वाटते म्हणूनच सारिका यांनी पूर्णपणे केमिकलमुक्त आणि १०० टक्के बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिन बनवले, जे खूप मऊ आणि आरामदायक आणि आरोग्यासाठी चांगले आहेत.