माणसाला लाभलेल्या या नेत्ररुपी देणगीने तो या जगाचा रंगीत पसारा आपल्या मेंदूच्या कोपऱ्यात साठवून ठेवत असतो. पंचेंद्रियांपैकी असणाऱ्या या एका इंद्रियाला जराही धक्का लागला तर ते आयुष्यातील रंगाचा बेरंग झाल्याशिवाय राहणार नाही. पण जे जन्मतः दृष्टिहीन आहेत अशा मंडळींचं काय? ज्यांना अपघाताने आपले डोळे गमवावे लागलं असेल त्यांचं काय? या मंडळींप्रति आपल्या मनात सहानुभूती असते. सहानुभूती असण्यात काहीच गैर नाही. पण सहानुभूतीने त्यांचे प्रश्न सुटत नाहीत. प्रश्न सुटतात ते जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नाने. आजच्या या ब्लॉग मध्ये आपण एका अशा दुर्गेबद्दल जाणून घेणार आहोत जिने या दृष्टिहीन मंडळींना फक्त सहानुभूती नाही तर त्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी प्रयत्न केले. अक्षिता सचदेवा आणि त्यांची ट्रेसल लॅब या नेत्रहीन मंडळींच्या अडचणी कमी करण्यासाठी प्रयत्न करते. ट्रेसल लॅब निर्मिती कीबो हे यंत्र आणि तंत्र नेत्रहीन मंडळींच्या दैनंदिन आयुष्यात प्रकाशकिरण ठरत आहे. अक्षिता यांनी नक्की कोणते प्रॉडक्ट विकसित केले आहे? त्याचा फायदा नेत्रहीनांना कसा होतो? त्यांचा हा प्रवास कसा होता? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या ‘जागर नवदुर्गां’च्या या भागातुन करणार आहोत.
ही घटना आहे अक्षिता यांच्या लहानपणीची. वयाच्या आठव्या वर्षी त्यांच्या आजीला कॅन्सरमुळे ईश्वराज्ञा झाली. त्यावेळी त्यांच्या आजोबांनी छोट्या अक्षितासमोस एक खंत व्यक्त केली. ‘किती बरे झाले असते जर आपल्या कुटुंबात देखील एखादी व्यक्ति डॉक्टर असती.’ आजोबांची ही खंत पुसुन टाकण्यासाठी डॉक्टर होण्याचा विडा अक्षिताने उचलला. डॉक्टर होण्याचे ध्येय उराशी बाळगत मॅट्रिक नंतर त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. इथे त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण लाभले. फक्त डॉक्टर होऊन समाजाच्या भरभराटीसाठी योगदान देता येणार नाही याची जाणीव त्यांना झाली. त्यांनी आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न बाजूला ठेवले आणि आपला मोर्चा यांत्रिकी क्षेत्राकडे वळवला.
अक्षिता सचदेवा यांनी २०१६ मध्ये मानव रचना कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात असताना, अक्षिताने महाविद्यालयीन प्रकल्पात दृष्टिहीन लोकांसाठी हातमोजे तयार केले. याच्या माध्यमातून नेत्रहीन मंडळींना वाचन सोपे जाऊ लागलं. जेव्हा त्या आणि त्यांची टीम चाचणीसाठी दिल्लीतील एका एनजीओकडे गेले होते, तेव्हा एका लहान मुलाने हे उपकरण वापरल्यानंतर त्याच्या वडिलांना फोन केला. ‘बाबा, काही शास्त्रज्ञांनी माझ्या शाळेसाठी हातमोजे तयार केले आहेत आणि आता मी स्वतः वाचू शकतो आणि प्रवास करू शकतो’, आपल्या बाबांना तो कॉल वर सांगत होता. काही सेकंदांनंतर त्याने मागे वळून विचारले, ‘मला हे कधी मिळतील?’ तेव्हा तिच्याकडे त्याच्या प्रश्नाचे कोणतेही उत्तर नव्हते. पण त्याच्या त्या प्रश्नाने इथेच अक्षिता यांना त्यांचा मार्ग गवसला. सामाजिक नवकल्पना आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात काम करत राहण्यासाठी, अंध आणि दृष्टिहीन व्यक्तींची स्तिथी सुधारण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळाले आणि सुरू झाली ट्रेसल लॅबच्या पायाभरणी. या संपूर्ण प्रवासात त्यांना बोनी या त्यांच्या सह संस्थापकाची मोलाची साथ लाभली.
कीबोची कमाल:-
आज देशातील नेत्रहीन लोकांचा विचार केला तर ही संख्या १८ दशलक्षच्या घरात जाते. दिवस असो वा रात्र त्यांच्या नशिबी कायम काळोख. या अंधारात वाचन करायचे म्हणजे एक दिव्यच. ब्रेललिपीचा प्रसार जगभर झाला आहे. पण सर्वच गोष्टी वाचताना तिचा उपयोग होत नाही किंवा सर्व प्रकारचे लेखन ब्रेलमध्ये उपलब्ध नाही. मग अशा परिस्थितीत वाचन करायचे कसे? ‘कीबो’ हा यावरील तोडगा आहे. ट्रेसल लॅबने तीन उत्पादन बाजारात आणले आहेत.
१. कीबो डेस्क वेब सॉफ्टवेअर
याच्या साहाय्याने कोणतीही इमेज वा पीडीएफ मधील श्राव्य स्वरूपात उपलब्ध होते. आपल्याला वाचायचे असलेल्या साहित्याचे फोटो वा पीडीएफ आपण या कीबो डेस्क वेब सॉफ्टवेअर मध्ये टाकले, की यातील प्रणाली ते शब्द वाचते आणि तुमच्या पर्यंत ती ऑडिओ रुपात पाठवते.
२. किबो एक्सएस डिव्हाइझ
हे उत्पादन क्रेसा लॅबचे बहुमूल्य संशोधन आहे. ३०० पानांचे पुस्तक देखील काही मिनिटांत हे वाचून ऑडिओ मध्ये रूपांतरित करू शकते. किबो एक्सएस डिव्हाइझ हे आपल्या सर्वसामान्य टेबले लॅम्प प्रमाणे दिसते. मात्र याचे कार्य पुस्तकावर प्रकाश टाकण्यापर्यंत मर्यादित नाहीये. किबो एक्सएस डिव्हाइझ हे याच्याही पुढे जात पुस्तकाचे ऑडिओ बुक तयार करू शकते.
३. किबो मोबाईल ॲप्लिकेशन
अलीकडे ॲप्लिकेशन हाताळणे हे तसे सोईचे झाले आहे. त्यामुळे कीबो डेस्क वेब सॉफ्टवेअर प्रमाणे मोबाईल मध्येही कार्य करू शकेल असे कीबो मोबाईल ॲप्लिकेशन देखील ट्रेसलने डेव्हलप केले आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे गूगल लेन्सला जे शक्य नाही तेही याच्या माध्यमातून करता येते. जसे की, पीडीएफ वाचणे.
★ काही प्रश्नोत्तरे
१. करोना काळात तुमचा संघर्ष कसा राहिला?
स्टार्टअप म्हंटल की अडचणी या येणारच. तुम्ही त्यावर कसे मात करता यावर तुमचं यश अवलंबून असतं. करोना ही जागतिक समस्या होती. आम्हालाही कारणे देता आली असती, सहकार्यांना कामावरून कमी करता आले असतं. पण आम्ही यावर मार्ग काढला. जेव्हा संकटे येतात तेव्हा संधी देखील येत असते. आम्ही ती संधी शोधून काढली. कीबो मोबाईल ॲप्लिकेशन ही आमची संधी होती आणि आम्ही ती साधली.
२. भविष्यात ट्रेसलचे उद्धिष्ट काय आहे?
सध्या आम्ही देशातील १५०० हुन अधिक शाळा, कॉलेजेस आणि संस्थांना आमची सेवा पुरवतो. ही संख्या मोठी असली तरी आमचं उद्धिष्ट त्याहून मोठं आहे. सर्वप्रथम आम्हाला देशातील शाळा, कॉलेजेस आणि संस्थांच्या माध्यमातून प्रत्येक गरजूंपर्यंत पोहोचायचं आहे. त्यानंतर पुढील उद्धिष्ट जागतिक स्तरावरील असेल. आज आफ्रिकेच्या काही देशांत आम्ही भागीदारीत आमची सेवा पुरवत आहोत.
३. तरुणांना काय संदेश द्याल?
आजचे युग हे वेगाचे आहे. त्यात तरुणांना झटपट सर्व हवं आहे. पैसा, प्रसिद्ध सर्वच लगेच हवं असतं. पण यशस्वी होण्यासाठी काही काळ द्यावा लागतो. या कालावधी स्पर्धेत टिकून राहणे, अडचणींना सामोरे जात समर्थपणे उभे राहणे ज्याला जमते तोच यशस्वी होतो. त्यामुळे तरुणांनी ध्येय गाठताना जिद्द, चिकाटी आणि मेहनत करत राहावी, असंच मी म्हणेन.