समाज सुधारक आणि पर्यावरण प्रेमी यांनी देशाच्या शाश्वत विकासात मोलाचा वाटा उचलला आहे. समाजाला अधिकाधिक प्रगल्भ बनवणे हे समाजसुधारकाचे कार्य, तर पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्नशील राहणे हा पर्यावरण प्रेमींचा ध्यास. या दोन बाजूंना एकत्र सामावून घेईल असा एक स्टार्टअप २०१८ मध्ये सुरू झाला. ‘पॅडकेअर लॅब‘ हे त्याचे नाव आणि त्याचे सह-संस्थापक आहेत आसावरी काणे. यांचा स्टार्टअप कचऱ्यात जाणाऱ्या सॅनिटरी पॅडचा पुनर्वापर करतात. कचऱ्यात टाकल्या जाणाऱ्या आणि वर्षानुवर्षे विघटित न होणाऱ्या या सॅनिटरी पॅडचा पुनर्वापर ही मंडळी करतात तरी कसे? शिवाय ही कल्पना आणि त्या कल्पनेला मूर्त रूप देण्यात कसे आले? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या ‘जागर नवदुर्गांचा’च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
आसावरी मूळच्या ठाण्याच्या. त्यांचं शिक्षण हे मात्र मुंबई पुणे या दोन शहरांतून झाले. मायक्रो बायोलॉजी मध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण हे बायो टेकनोलॉजीमधून केले. वडील आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरदार, आई गृहिणी आणि पाठीमागे शिक्षण घेणारी लहान बहीण अशा सर्वसाधारण कौटुंबिक वातावरणात आसावरी लहानाच्या मोठ्या झाल्या. व्यवसाय सुरू करावा, स्टार्टअपच्या मार्गावर जाण्याचं असं ध्येय हे कधी नव्हतंच. पण आयुष्य कोणत्या क्षणी कोणत्या दिशेने वळण घेईल याचा नेम नसतो. आपलं पदव्युत्तर शिक्षण पुण्यात घेत असताना त्यांच्या हॉस्टेलमध्ये नव्याने बसवण्यात आलेल्या सॅनिटरी पॅड इन्सिनेटर मशीनचा त्यांनी वापर केला. सॅनिटरी पॅड विघटित करण्यासाठी ते जवळपास ८००° तापमानावर घेऊन जावे लागते. आणि त्यामुळे खूप प्रमाणात धूर सुद्धा होतो, पर्यावरणाच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे हे त्यांच्या निदर्शनास आले आणि त्यांनी यावर उपाय योजना राबवण्यास सुरवात केली. यातच त्याचे पदव्युत्तर शिक्षण संपले मात्र अभ्यास चालूच राहिला. अशातच पॅडकेअरची संधी चालून आली. अजिंक्य यांनी सुरू केलेल्या पॅडकेअर मध्ये त्या प्रोजेक्ट असिस्टंट म्हणून रुजू झाल्या. सॅनिटरी पॅडचे विघटन करताना त्यातील विषाणू बाजूला करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. प्रोजेक्ट असिस्टंट म्हणून रुजू झालेल्या आसावरी यांना लवकरच त्यांच्या अंगभूत गुणांमुळे आणि शैक्षणिक पत्रातमुळे पदोन्नती मिळाली. आज पॅडकेअर मध्ये त्या सहसंस्थापकांपदासह रिसर्च सायंटिस्ट देखील आहेत.
पर्यावरणवादी पॅडकेअर
पॅडकेअर लॅबची सुरुवात १० जुलै २०१८ ला झाली. सॅनिटरी पॅड्सचा पुनर्वापर कसा करता येईल? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे ‘पॅडकेअर लॅब’. ही लॅबची स्थापना झाल्यापासून ते सुरुवातीचे दोन वर्षे टीमने सॅनिटरी पॅड्सचा पुनर्वापरच्या उत्तरासाठी वाहिले. याच काळात पॅडकेअर लॅबने सॅनिटरी पॅड जमा करण्यासाठी पॅडकेअर बिन आणि साठवलेले पॅड प्रोसेस करण्यासाठी पॅडकेअर मशीन तयार केली.
आज पॅड केअर लॅबकडून वापरलेले सॅनेटरी पॅड प्रोसेस केले जातात आणि त्यापासून विविध वस्तू बनवल्या जातात. लिहिण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वह्या (डायरी), कॅलेंडर, प्लास्टिकचे पॅलेट्स आणि पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध वस्तू बनवल्या जातात. सध्या मार्केटमध्ये विविध प्रकारची सॅनिटरी पॅड इन्सिनेटर्स वापरले जातात ज्याच्यामध्ये सॅनिटरी पॅड उच्च तापमानाला हिटरच्या माध्यमातून जाळले जातात. ज्याच्यामुळे धूर होतो. परिणामी प्रदूषणास अजून एक कारण मिळते. त्यामुळे पॅडकेअर लॅबने सॅनिटरी पॅड स्टोर करण्याकरिता पॅड केअर बिन आणि ते रिसायकल करण्याकरता मशीन बनवले आहेत. सॅनिटरी पॅड पॅडकेअर लॅबच्या मशीन मध्ये प्रोसेस केले जातात आणि त्याच्यामधून प्लास्टिक आणि सेल्युलोज हे दोन्ही प्रॉडक्ट वेगवेगळे काढले जातात. प्रोसेस केलेल्या सॅनिटरी पॅड पासून मिळणाऱ्या प्लास्टिक आणि सेल्युलोज पासून विविध प्रॉडक्ट बनवले जातात.
विविध कंपन्या, कार्पोरेट ऑफिस, शाळा कॉलेजेसच्या वॉशरूम मध्ये पॅड केअर बिन्स बसवले आहेत. त्यांत वापरलेले सॅनिटरी पॅड्स साठवण्यात येतात. सरासरी एका पॅडकेअर बिनची क्षमता ७५ सॅनिटरी पॅड साठवून ठेवण्याइतकी आहे. दर आठवडा, पंधरवड्यात किंवा दर महिन्यांनी जशी गरज असेल त्यानुसार वापरलेले सॅनिटरी पॅड पॅडकेअर लॅब कडून कलेक्ट केले जातात आणि ते प्रोसेस केले जातात. पॅड केअर लॅबने सॅनिटरी पॅड प्रोसेस करण्याकरिता जी मशीन बनवली आहे, एक मशीन दिवसाला शंभर किलो पर्यंत वापरलेले सॅनिटरी पॅड प्रोसेस करू शकते. भारतातील विविध सहा शहरांत यात पुणे, बेंगलोर, हैदराबाद, मुंबई, दिल्ली आणि चेन्नई या शहरांमध्ये पॅडकेअर लॅब कडून सुविधा पुरवली जाते. तिथून वापरलेले सॅनिटरी पॅड्स कलेक्ट केले जातात आणि पुण्यामध्ये त्यावरती रिसायकलिंगची प्रोसेस केली जाते. पी अँड जी, महिंद्रा, रेमंड, सॅंडविक, फेसबुक यासारख्या कंपन्यांना आज पॅडकेअर लॅबकडून सुविधा पुरवली जाते. त्याचबरोबर पुण्यामधील काही शासकीय संस्था तसेच कॉलेजेस तसेच मुंबईमधील काही कॉलेजेस जसे की रुईया कॉलेज, एस आय इ एस कॉलेज अशा विविध कॉलेजांत सुद्धा पॅडकेअर बीन्स बसवले आहेत.