आर्थिक गैरव्यवहार थांबवणारी अपूर्वा
‘इस लाश का मुंह तो अब डॉ. सालुंके ही खुलवायेगा’ हा डायलॉग आपण अनेकदा सोनी टीव्ही वरील सीआयडी या मालिकेत ऐकला असेल. थोडक्यात काय तर डॉ. साळुंके ही व्यक्ती मृत शरीराकडून देखील पुरावे मिळवण्याची क्षमता ठेवते. डॉ. साळुंके म्हणजे सीआयडी मधील न्यायवैदक अहवाल (फॉरेन्सिक रिपोर्ट) तयार करणारं पात्र. फॉरेन्सिक रिपोर्ट ही कल्पना आता सर्वज्ञ आहे. ‘फॉरेन्सिक रिपोर्ट’ हा फक्त एखाद्या शरीराचा मिळतो असं नाही. तर तो आर्थिक व्यवहाराचा देखील तयार करता येतो. ‘न्यायवैद्यक लेखा’ अर्थात ‘फॉरेन्सिक अकाउंटिंग’ आर्थिक व्यवहारांची चिकित्सा करण्यासाठी केलं जातं. याच काहीशा अनोळखी वाटेवर आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे ‘डॉ. अपूर्वा प्रदीप जोशी‘ यांनी. गेले जवळपास एक तप ते या क्षेत्रात कार्यरत आहेत.
फॉरेन्सिक अकाउंटिंग:-
अकाऊंटिंग, तंत्रज्ञान आणि तपासकार्य अशी सर्व प्रकारची कौशल्ये एकत्रितरीत्या उपयोगात आणून न्यायालयात सादर करता येईल असा ठोस पुरावा शोधणे वा मिळवणे म्हणजे ‘फॉरेन्सिक अकाऊंटिंग’. एखाद्या कंपनीत वा संस्थेत आर्थिक घोटाळा झाला आहे की नाही याची तपासणी करून त्याचा अहवाल तयार करण्याचं काम हे फॉरेन्सिक अकाऊंटिंग अंतर्गत येतं. साध्या शब्दात आर्थिक गैरव्यवहारांचा पदडाफाश करण्याचं काम फॉरेन्सिक अकाऊंटंट करत असतात. अपूर्वा जोशी यांची रिस्कप्रो ही देखील हेच कार्य करते.
अपूर्वाचा अपूर्व प्रवास:-
सोलापूर जिल्ह्यातुन पुणे शहर अपूर्वा गाठते. ध्येय एकच उराशी बाळगलेली स्वप्ने सत्यात उतरविणे. पण स्वप्नपूर्ती म्हणजे ‘बाहुल्यांचा खेळ नाही’. अपार मेहनत, टिकून राहण्याची चिकाटी, संकटांना भिडण्याचं सामर्थ्य आणि संधीचं सोनं करण्याची तयारी असली म्हणजे स्वप्नपूर्तीचा प्रवास अशक्य राहत नाही. या ताकदीवर अपूर्वा आपल्या करिअरची यशस्वी वाटचाल करताहेत. घरचं वातावरण पांढऱ्या कोटातील अर्थात आई आणि वडील दोघेही डॉक्टर. पण त्यामुळे आपल्या मुलीनेही डॉक्टरच व्हावं असं त्यांना कधी वाटलं नाही. उलट आपल्या मुलीने काहीतरी वेगळं करून दाखवावं असंच त्यांना वाटे. यामुळेच अपूर्वा यांनी वाणिज्य शाखेची वाट धरली. या वाटेवर चालताना ध्येय होतं वाणिज्य शाखेतील सर्वोच्च स्थान मिळवण्याचं, सीए होण्याचं! यासाठी सोलापूरहुन त्यांनी पुणे गाठले. पदवीचे शिक्षण घेताना त्यांनी आर्टिकलशिप जॉईन केली. आर्टिकलशिप करताना आर्थिक गैरव्यवहार आणि ‘फॉरेन्सिक अकाऊंटिंग’शी त्यांचा संबंध आला. आणि इथूनच अपूर्वा जोशी यांना आपली वाट गवसली.
काहीतरी वेगळं करून दाखवण्याची संधी आणि मार्ग त्यांना फॉरेन्सिक अकाऊंटिंग मध्ये दिसू लागला. एकीकडे अपूर्वा यांनी साडेतीन वर्षांची आर्टिकलशिप संपवली होती, दुसरीकडे त्या सीए होण्याच्या अंतिम टप्प्यात त्या होत्या. मग अशाप्रसंगी मन द्विधा मनस्थितीत अडकून पडते. पण अपूर्वा याला अपवाद ठरल्या. घरच्यांचा पुरेपूर पाठिंबा आणि घेत असलेल्या रिस्कचा हिशोब त्यांनी मांडला आणि फॉरेन्सिक अकाऊंटिंग क्षेत्रात २०११ मध्ये स्टार्टअप सुरू केला. त्यांची सुरवात ही ‘फ्रॉड एक्सप्रेस’च्या मिडीया पोर्टलच्या माध्यमातून झाली.
अँटी फ्रॉड मीडिया
फ्रॉड एक्सप्रेस हे त्यावेळी फॉरेन्सिक अकाऊंटिंगसाठी वाहिलेले पहिलं मीडिया पोर्टल होते. या पोर्टलच्या माध्यमातून त्यांचं या क्षेत्रातील लेखन सुरू झालं. वेगवेगळ्या अँटी फ्रॉड प्रोफेशनल मंडळींच्या मुलाखती त्यांच्या पोर्टलवरून प्रसिद्ध होऊ लागल्या. हे करत असताना त्यांनी आपल्यासोबत महिलांना या क्षेत्रात वळवण्यास प्राधान्य दिलं. आर्टिकलशिप करताना असेल किंवा फॉरेन्सिक अकाऊंटंट म्हणून वावरताना असेल त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती, ती म्हणजे या क्षेत्रातील महिलांचा अपुरा सहभाग. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या कंपनीत महिलांना प्राधान्य दिले. हळूहळू या क्षेत्रात त्यांनी आपले पाय रोवण्यास सुरवात केली. लोकांना त्यांच्या कामाबद्दल कुतूहल वाटू लागलं. पण हे सर्व घडत असताना मार्केटिंगचा गहन प्रश्न समोर उभा होता. स्टार्टअप सुरू केला खरा पण त्याच्या मार्केटिंग साठी लागणारा पैसा आणायचा कुठून? घरून पैसे घ्यायचे नाहीत किंवा कंपनीसाठी कर्ज देखील घ्यायचं नाही यावर त्या ठाम होत्या. मग करायचं काय?
विनाकर्ज योजना
यावर त्यांनी तोडगा शोधला तो असा, की वेगवेगळ्या सरकारी संघटनांना त्या मीडिया पार्टनर होऊ लागल्या. त्यामुळे कार्यक्रमात बॅनरवर त्यांच्या कंपनीचे नाव झळकू लागले. आता लोकांना प्रश्न पडू लागले, ‘फ्रॉड एक्सप्रेस नक्की काय आहे? काय करतात हे?’ लोकांमध्ये चर्चा घडू लागल्या आणि त्यांनी कंपनीकडे विचारणा येऊ लागल्या. पर्यायाने कंपनीच्या क्लायंटमध्ये वाढ होऊ लागली. अनेक क्लायंट कंपन्या या परदेशी होत्या त्यामुळे त्यांचं उत्पन्न डॉलर मध्ये येऊ लागले. हे सर्व सुरळीत सुरू असताना २०१२ मध्ये त्यांच्या आई स्वर्गवासी झाल्या. त्यामुळे त्यांना सोलापूर गाठावे लागले. त्यानंतर जवळपास वर्षभर त्यांचा मुक्काम सोलापुरात होता. शिक्षण क्षेत्रासाठी त्यांना काहीतरी करायचं होतंच. त्यामुळे त्यांनी सोलापूर विद्यापीठाशी संपर्क साधला. सोलापूर विद्यापीठाने त्यांना संधी देऊ केली. त्या संधीचं सोनं करत त्यांनी सोलापूरच्या विद्यापीठासाठी चार प्रकारचे सर्टिफाइड कोर्सेस तयार केले. आपले कार्य नियोजनबद्ध असेल तर अपयशी होण्याची शक्यता मावळते. यामुळेच कदाचित स्टार्टअप असूनही अपूर्वा जोशी यांना आपल्या कंपनीसाठी कर्ज घेण्याची वा गुंतवणूकदारांची दारे ठोठावण्याची आवश्यकता भासली नाही.
रिस्कप्रोमध्ये पाऊल
लोकांनी उभे केलेले प्रश्न, स्टार्टअप सुरू केल्यावर आलेली संकटे यांना तोंड देताना फ्रॉड एक्सप्रेसचा आलेख कधीच खालच्या दिशेने वळला नाही. तो कायम वरच जात राहिला. वरच्या दिशेने जाण्याचं सातत्य राखणाऱ्या त्यांच्या कंपनीच्या आलेखाची दखल रिस्कप्रोने घेतली. आणि २०१३ मध्ये रिस्कप्रोने फ्रॉड एक्सप्रेसला स्वतःमध्ये सामावून घेतलं. रिस्कप्रो मध्ये अपूर्वा जोशी या डायरेक्ट झाल्या आणि मग त्यांना कधी मागे वळून पहावं लागलं नाही. आज पाहिले तर फॉरेन्सिक अकाऊंटिंग क्षेत्रात त्यांचा दबदबा आहे. याशिवाय जवळपास अर्धा डझन कंपन्यांच्या त्या डायरेक्ट आहेत.
स्टार्टअप समाचार
अपूर्वा यांचा महिला उद्योजिका म्हणून प्रवास पाहता लोकसत्ताने त्यांचा २०१९च्या मार्चमध्ये ‘तरुण तेजांकित‘ पुरस्कार देऊन गौरव केला. पुढे लोकसत्ता तर्फे ‘स्टार्टअप विषयावर लेखन करणार का?’ याची विचारणा त्यांना करण्यात आली. मग जवळपास वर्षभर ‘सदा सर्वदा स्टार्टअप’ या विषयावर त्यांनी वाचकांचे समुपदेशन केले. स्टार्टअप विषयाबद्दल असणारे गैरसमज, स्टार्टअप सुरू करताना लागणाऱ्या आवश्यक तरतुदी, गुंतवणूकदार मिळवण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न या आणि अशा अनेक विषयांवर त्यांनी वर्षभर वाचकांना भरभरून ज्ञानदान केले. एवढचं नाही तर याविषयावर त्यांनी अनेकांना मार्गदर्शन देखील केलं.
…तर प्रवासाच्या टोकावर अपयशच
व्यवसाय वाढवायचा म्हणजे आपण लगेच बँक वा गुंतवणूकदार यांची दारे ठोठावतो. पण ते खरंच योग्य आहे का? अपूर्वा म्हणतात, ‘व्यवसाय वृद्धी करायची असेल तर आधी व्यवसाय स्थिर करा. स्थिर झालेल्या व्यवसायाच्या नफ्यातील काही रकमेची व्यवसायत पुनर्गुंतवणूक करा आणि आवश्यकता असेल तेव्हाच कर्ज वा गुंतवणूकीचा मार्ग स्वीकारा. हे सर्व करत असताना आपल्या कंपनीच्या रेव्हेन्यू मॉडेलकडे कानाडोळा होणार नाही याची काळजी घ्या. कारण अखेरीस व्यवसाय सुरू करता येतो, त्यात पैसे टाकता येतात पण, रेव्हेन्यू मॉडेल योग्य नसेल तर प्रवासाच्या टोकावर अपयशच पदरी पडणार.’
स्वतःला पुढील तीन वर्षात कुठे पाहता?
या विषयावर विचारणा केली असता अपूर्वा सांगतात, ‘माझ्या कंपनीचा किमान दोन खंडात नावलौकिक वाढवलेला मला पाहायचा आहे. आजवर विविध क्षेत्रात विविध कंपन्यांमध्ये मी कार्य केले आहे. ऑटोमोबील, सायबर सेक्युरीटी, बँकींग अँड फायनांस, एफएमसीजी यासारख्या अनेक कंपन्यांच्या बोर्डावर मी स्वतःकार्यरत आहे. त्या कंपन्यांचे आयपीओ येताना मी पाहिले आहेत. आयपीओ कसा आणला जातो, त्यासाठी पात्रता निकष काय हे आता मला मुखोद्गत झालंय. त्यामुळे पुढच्या तीन वर्षात मला माझ्या कंपनीचा आयपीओ बाजारात आलेला पाहायला आवडेल. आणि शेवटचं म्हणजे इतर स्टार्टअपमध्ये एक इन्व्हेस्टर, एक मेंटर म्हणून काम करायला आवडेल.’
देशवासी व्हावे
आजवर अपूर्वा शंभरहून अधिक तरुणांना मार्गदर्शन केलंय, यशस्वीतेचे धडे दिले आहेत. यातील बहुतांश मंडळींनी आपल्या यशाचा मार्ग परदेशी कंपनीत आणि परदेशी भूमीत शोधला याची खंत अपूर्वा व्यक्त करतात. ‘आपल्या तरुणांनी इथे शिक्षण घेऊन परदेशात जाण्यापेक्षा इथेच आपल्या देशात राहून इथे काय करता येईल याचा मागोवा घ्यायला हवा. इथून शिक्षण घेऊन परदेशात जाण्यापेक्षा तिथून शिकून त्याचा वापर देशासाठी करायला हवा. तरुणांनी आता देशवासी होण्याची आज गरज आहे. आपल्या देशासाठी आपण काय देऊ शकतो याचा गांभीर्याने विचार आता व्हायला हवा.’ अशी अपूर्वा यांची अपेक्षा आहे.
तरुणांना काय संदेश द्याल?
‘मला असं वाटतं की तरुणांनी आव्हान स्वीकारले पाहिजेत. आव्हान स्वीकारून आणि त्यावर विजय मिळवूनच आपली प्रगती होऊ शकते. आपण आपली अल्पसंतुष्टी वृत्तीचा आता त्याग करायला हवा. याशिवाय शिक्षण कधीही थांबत नाही याची आपल्याला जाणीव व्हायला हवी. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीतून आपण शिक्षण घेतले पाहिजे. हा आपला विद्यार्थी दृष्टिकोन आपल्याला अधिकाधिक प्रगल्भ बनवतो.’, या शब्दात तरुणांच्या संदेशात अपूर्वा यांनी आपलं मत मांडलं आहे. याखेरीज तरुणांना स्वप्न बघण्याचे आवाहन करतात. पुढे ‘बघितलेले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्या स्वप्नांचा मागोवा घ्या’, असंही अपूर्वा म्हणतात.
यानिमित्ताने ‘चूल आणि मूल’ ही संकल्पना मोडीत काढत अनेक घरातील चुली या अपूर्वा यांच्यामुळे सुरू आहेत असं म्हंटल तर वावगे ठरू नये. स्त्रीने ठरवले तर तिला काहीही अशक्य नाही. लिंगभेदाच्या भिंती भेदून केव्हाच स्त्रिया पुढे निघून गेल्या आहेत हे अपूर्वा जोशी यांच्या प्रवासातून उलगडत जाते.