काम करण्याची जिद्द आणि त्या कामावर आपली ‘श्रद्धा’ असली की कोणतीच गोष्ट अशक्य नसते
मेहनतीला कधीच ‘वय’ आड येत नाही. कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी कोणत्याही अनुभवाची गरज नसते. गरज असते ती मेहनतीची! काम करण्याची जिद्द आणि त्या कामावर आपली ‘श्रद्धा’ असली, की कोणतीच गोष्ट अशक्य नसते. हीच गोष्ट करून दाखवली आहे, महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील निघोज गावातल्या ‘श्रद्धा ढवण – ढोरमले’ यांनी. वयाच्या १०व्या वर्षापासुन सुरु झालेल्या कौटुंबिक दुग्ध व्यवसायाचा व्याप कैक पटीने श्रद्धा यांनी वाढवला आहे. सुरवातीला असणारी २ म्हशींची संख्या आज ८० म्हशीनपर्यंत पोहचविण्याचे काम श्रद्धा यांच्या ‘श्रद्धा डेरी फार्म’ने केले आहे. त्यांचा हा प्रवास कसा होता? त्यांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं? त्यांनी या व्यवसायात कशा नव्या वाटा धुंडाळल्या? आता पुढची वाटचाल कशी असणार आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला आज जाणून घ्यायची आहेत.
श्रद्धाच्या वडीलांना लहानपणीच पोलियोमुळे अपंगत्व आले. त्यामुळे शेतीला पुरक व्यवसाय करण्यावर त्यांनी भर दिला. स्वत:च्या म्हशींचे दुध ते विकत असतं. श्रद्धा देखील बाबांच्या या व्यवसाय हातभार लावत असतं. वडिलांच्या शाररिक मर्यादांमुळे अनेकदा त्यांना दुचाकी चालवणे शक्य होत नसे. यासाठी नववीत असणाऱ्या श्रद्धाने स्वतः दुचाकी शिकण्याचा निर्णय घेतला. हे प्रशिक्षण सहज सोपे नव्हते. अखेर सर्व समस्या सोडवत आणि वडिलांचा आधार बनत श्रद्धाने दुचाकीवरुन घरोघरी जाऊन दूध पोहोचवण्याचे काम सुरु केलेच. एव्हाना दोन म्हशींची संख्या वाढून ८ झाली होती. बरं, हे सर्व सुरु असताना आपल्या शिक्षणाला कुठेही धक्का लागु न देण्याची खबरदारी श्रद्धाने घेतली. या काळात पहाटे साडेतीन-चार वाजता उठून म्हशीची सगळी काम उरकुन त्या तिथून कॉलेजला जाणे, तिथून सुटल्यावर परत संध्याकाळी हीच काम करणे, हा त्यांचा नित्यक्रम. रोज सकाळी उठुन म्हशीची काळजी घेणे, गोठ्यात स्वच्छता राखणे, दुध संकलन केंद्रात दुध पोहोचवणे ह्या सगळ्या गोष्टी पार पाडत श्रद्धाने एमएसी फिजिक्समध्ये उच्च शिक्षण ही पुर्ण केले.
एकेकाळी एका म्हशीवर चालणारा हा दुग्धव्यवसाय त्यांनी ८० म्हशींपर्यंत पोहचवला. पत्र्याच्या साध्या गोठ्याचे परिवर्तन कॉक्रीटच्या दुमजली गोठ्यात करण्याचा प्रवास सोप्पा नव्हता. कोणतंही काम करताना संकटे येतात. श्रद्धाला देखील बऱ्याच संकटांना सामोरं गेल्या. पशुपालनासाठी लागणारे साहित्य, म्हशींना लागणारा चारा ह्यासाठी येणाऱ्या बऱ्याच समस्यांना त्यांना सामोरं जावं लागलं. गुरांना पोषक आहार, त्यांची स्वछता ह्या सगळ्या गोष्टी श्रद्धा आजही नियमितपणे करतात. म्हशींना लागणाऱ्या चाऱ्याची लागवड त्यांनी आपल्याच शेतात केली. त्यांचा धाकटा भाऊ कार्तिक त्याने पशुवैद्यकीय शिक्षण घेतले आहे. तोही आता आपल्या मोठ्या बहीणीला साथ देतो. तसेच श्रद्धा यांनी त्यांच्या आई वडिलांच्या पाठिंबा कायम मिळतो. एकंदर काय तर तिच्या या कार्यात कुटुंबाची साथ तिला वेळोवेळी लाभत गेली. अलीकडे त्यांचं श्री चैतन्य ढोरमले यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर सासरची जबाबदारी सांभाळत दुग्ध व्यवसायाचा पसारा त्या सांभाळत आहेत.
◆ काम करण्यात कमीपणा नसावा
एकदा आईकडे चॉकलेटसाठी छोट्या श्रद्धाने आग्रह धरला तेव्हा आईने, ‘आपल्या दोन म्हशींना धु आणि पैसे घेऊन जा’चा सल्ला त्यांना दिला. त्यामुळे असेल कदाचित व्यवसाय एवढ्या मोठ्या पातळीवर घेऊन जाऊन देखील आजही त्यांना म्हशींचे दूध काढणे, त्यांना अंघोळ घालणे, गोठा स्वच्छ करताना कुठलाही कमीपणा वाटत नाही.
खरंच मेहनतीला वय आड येत नाही हे श्रद्धा यांनी दाखवून दिलं आहे. इतक्या कमी वयात, इतक्या मोठ्या जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे वाहील्या. दिव्यांग वडील, गृहीणी आई, मागे लहान भाऊ आणि आता सासर अशा अनेक जबाबदऱ्या सांभाळत आज श्रद्धा अहमदनगर जिल्हातली सर्वात मोठी डेअरी फार्म चालवणाऱ्या पहिला महिला ठरल्या आहेत.
◆ स्त्रीच्या यशामागे पुरुषाचा हात
साधारण एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते असा समाजात समज आहे. पण अनेकदा याच्या उलट गणित आपल्याला पाहायला मिळतं. श्रद्धा यांच्या बाबतीत देखील हेच घडलं. सुरवातीला बाबा आणि लग्नानंतर नवऱ्याकडून वेळोवेळी पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळत राहिले. ‘समाजात किंवा व्यवसायात स्त्री म्हणून वावरताना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं का?’ या प्रश्नावर त्या हसतात आणि सांगतात, ‘मला माझे बाबा लहानपणापासून पठ्या म्हणायचे. पठ्या म्हणजे लाल मातीत ताकदीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्याला धुळ चारणारा कुस्तीगीर. बाबांनी मला कधीच मुलगी असल्याची जाणीव होऊच दिली नाही. मला आठवतंय लहानपणी कुस्ती खेळताना मी अनेकांना चितपट केलंय. बाबांनी मला कायम पाठिंबा दिला. शिक्षण असेल, दुचाकी प्रशिक्षण असेल किंवा मग लग्न असेल कुठेही माझ्या मतांचा अनादर झाला नाही. उलट त्यांचा सन्मानच केला गेला.’ बाबांनंतर त्यांची जागा घेतली श्रद्धा यांचे जीवनसाथी श्री. चैतन्य संजय ढोरमले.
◆ शेतकऱ्यांनी श्रीमंत व्हावे
अलीकडे श्रीमंतीचा मार्ग शेतातून नाही तर शहरातून जातो असा समज अनेक खेड्यात पसरत चालला आहे. पण हा समज किती चुकीचा आहे याचे धडे ‘दूध व्यवसायातील पंचसूत्री’ मध्ये श्रद्धा देणार आहेत. श्रद्धा आणि त्याचे पती चैतन्य ढोरमले यांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांना श्रीमंत करण्याचा विडा उचलला आहे. चैतन्य ढोरमले यांनी स्वतः बायोकेमिस्ट्री आणि पर्यावरण विज्ञान क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आता त्यांचा यावरील पीएचडीचा अभ्यास सुरू आहे. श्रद्धा, चैतन्य आणि त्यांचे अजून ८ सहकारी मिळून १ आणि २ ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय दुग्ध व्यवसायावर आधारित प्रशिक्षण कार्यशाळा राबवत आहेत. विशेष म्हणजे आपापला व्यवसाय सांभाळून दोघेही या कार्यात आपलं योगदान देत आहेत. व्यवस्थापन, व्यावसायिक बारकावे आणि योग्य मार्केटिंग यासंदर्भातील प्रशिक्षण ते यात देतील. देशातील १९८ गोठ्यांवर अभ्यास करून. गोठा चालणाऱ्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या टीमने त्या प्रशांची उत्तरे शोधली आहेत. याआधी दोन आणि आता ही तिसरी कार्यशाळा राबविण्यात येत आहे. योग्य नियोजन, चांगले आर्थिक ज्ञान आणि अंगी आवश्यक कौशल्य असलं म्हणजे यशाची दारे सताड उघडली जातात यावर या टीमचा ठाम विश्वास आहे. येत्या काळात या विषयावरील अधिक संशोधन करण्यासाठी हा चमू थेट नेदरलँडच्या भूमीत जाणार आहे. आपल्याला या देखील या प्रशिक्षण शाळेत भाग घ्यायचा असेल तर नक्की घेऊ शकता. त्यासाठी 8999910195 या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता.
◆ समजून घेताना…
१. शिक्षण आणि व्यावसाय याबद्दल आपलं काय मत आहे?
शिक्षण हे आवश्यक आहेच. पण जेव्हा मी व्यवसायिक म्हणून मागे वळून शिक्षणाकडे बघते तेव्हा मला वाटतं, अमुक शिक्षण घेतलं म्हणजेच तुम्ही व्यावसायिक होता किंवा अमुक शिक्षण नसेल तर तुम्ही व्यावसायिक होऊच शकत नाही असं नाही. मी स्वतः विज्ञान शाखेतून शिक्षण घेतले आहे, तरी व्यवसायाची आर्थिक सूत्रे मी सुरळीत रित्या वाहते आहे.
२. श्रद्धा डेरी फार्मची भविष्यातील वाटचाल कशी असेल?
आता आम्ही फक्त दूध संकलन आणि विक्री पर्यंत मर्यादित राहणार नाही. श्रद्धा डेरी फार्म आता तीन दिशेने वाटचाल करणार आहे.
१. शेतकरी प्रशिक्षण:-
शेतकऱ्यांनी व्यावसायिक म्हणून पुढे येणं गरजेचं आहे. त्यासाठी निवासी कार्यशाळा आम्ही राबवत आहोत.
२. खत निर्मिती:-
गांडूळ खत आणि बायोगॅस यासाठी आमचे प्रयत्न आणि प्रयोग सुरू आहेत.
३. दूध बॉटल:-
भेसळयुक्त दुधापासून मुक्तता करण्यासाठी आता श्रद्धा डेरी फार्म स्वतःची दूध बॉटल बाजारात भेसळमुक्त दूध बाजारात घेऊन येणार आहेत.
३. तरुणांना काय संदेश द्यायला आवडेल?
कोणत्याही कामाची कधीच लाज बाळगू नये. आजकाल तरुणांना मोठ्या पगाराची नोकरी हवी असते. त्यांना कोणाच्या हाताखाली काम करायला लाज वाटते. पण मी म्हणेन, हॉटेलचं मालक व्हायचं असेल तर हॉटेलमधील भांडी घासाता आली पाहिजे. मुलींच्या बाबतीत बोलायचं झालं, तर मुली फार लाजतात. खेड्यात हे प्रमाण काहीसं अधिक असतं. लाजणे यात गैर नाही, पण हा लाजळूपणा आपल्या प्रगतीच्या आड येत असेल तर त्याचा नव्याने विचार व्हायला हवा.