‘एक बालक, एक शिक्षक, एक पेन, आणि एक पुस्तक संपूर्ण जग बदलू शकतात.’ हे वाक्य आहे सर्वात कमी वयात जगातील सर्वोच्च पुरस्कारावर आपलं नाव कोरणाऱ्या मलाला युसूफझाई या मुलीचं. ‘शिक्षणाने साध्य करू’ यावर टीम मॅक्झिमाचा ठाम विश्वास आहे. शिक्षण हे असं माध्यम आहे ज्याने ‘स्व’पासून ‘सर्वां’पर्यंतना आपण विकासाचा मार्ग घेऊन जाऊ शकतो. पण सर्वांच्या नशिबी वहिनी-पेन येतं का? पर्यायाने विकासाची कास धरण्याची संधी प्रत्येकाला मिळते का?
वरील प्रश्नाचे एका शब्दात उत्तर द्यायचे झाले तर ते दुर्दैवाने ‘नाही’ असेच येईल. आपल्या व्यवस्थेत अद्याप शैक्षणिक समतोल पाहायला मिळत नाही. आजही जेथे शहरी भागातील ८०% विद्यार्थ्यांना उच्च प्राथमिक शिक्षणासाठी एक किलोमीटरच्या आतील अंतर पार पाडावे लागते. त्याच वेळी ग्रामीण भागात हा टक्का थेट ३५% म्हणजे निम्याहून अधिक खाली घसरतो. उर्वरित ६५% विद्यार्थ्यांना एकाहून अधिक किलोमीटरची पायपीट करावी लागते. या आकडेवारीवरून एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे देशाला जागोजागी असणाऱ्या मंदिरातील देवांपेक्षा, ज्ञान देणाऱ्या ज्ञानपीठांची अधिक आवश्यकता आहे. इतर बाबींची चर्चा करायची झाल्यास त्यात शाळेतील हजेरी असो, इंटरनेट तसेच उपलब्ध तंत्रज्ञान असो वा उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या असो यात प्रकर्षाने जाणवते ती ग्रामीण आणि शहरी भागातील शैक्षणिक दरीची. या करोनाने या दरीची खोली आणि रुंदी वाढवली असणार हे वेगळं सांगायला नको. गेल्या ब्लॉगमध्ये ज्याप्रमाणे फ्रान्सच्या काही कठोर पण दूरदृष्टी असणाऱ्या निर्णयाबद्दल लिहिलं तसंच यावेळी ही शैक्षणिक असमानता दूर करण्यासाठी एका सामाजिक संस्थेबद्दल जाणून घेणार आहोत.
काही दिवसांपूर्वीच या संस्थेची आणि तिच्या कार्याची दखल फॉर्ब्स मासिकाने घेतली आहे. थिंकशार्प आणि त्याचे संस्थापक संतोष फड यांच्या समाजकार्याची ही दखल त्यांच्या संपूर्ण टीमसाठी नक्कीच अभिमानस्पद असेल.
◆ थिंकशार्प आणि शिक्षण:-
२०११ मध्ये संतोष फड यांनी या संस्थेला मूर्त स्वरूप प्राप्त करून दिले. या संस्थेने तिच्या स्थापनेच्या अवघ्या दोन वर्षात ‘स्टडी मॉल’ (Study Mall) ही एक महत्वकांक्षी संकल्पना सर्वांसमोर आली. मुळात या संस्थेचे उद्धिष्ट ग्रामीण भागातील शैक्षणिक विकास हे आहे. त्यात या संस्थेच्या ‘स्टडी मॉलने’ यात महत्वपूर्ण कामगिरी बजावली असे म्हंटले तर ववागे ठरू नये. तंत्रज्ञान ही काळाची गरज आहे. मात्र तंत्रज्ञानाचा प्रसार ज्या वेगाने शहरी भागात होतो त्या वेगाने ग्रामीण भागात होत नाही हे वास्तव आहे. हे वर्तमान भविष्यात कायम राहू नये याकरिता थिंक शार्प संस्था विविध उपक्रम राबवत असते. यात डिजिटल शिकवणी, तंत्रज्ञानाधरीत शिक्षण, डिजिटल ग्रंथालयांद्वारे वाचन आवड, विना व्यत्यय विजेसाठी ‘सोलार शाळा’ हे आणि असे अनेक बहुरंगी उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येतात.

आजपर्यंत, या संस्थेने महाराष्ट्रातील १२ वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या ६१ ग्रामीण शाळांना मदत केली आहे. संस्थेच्या वेगवेगळ्या उपक्रमांचा उपयोग करून घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ९ हजारहुन अधिक आहे. याचीच पोच पावती म्हणजे फोर्ब्सने घेतलेली थिंक शार्पच्या कार्याची दखल.
◆ संतोष फड
उदयोन्मुख अर्थव्यस्थेतील उद्योजकता (Entrepreneurship in Emerging Economies) या विषयात हार्वर्ड बिझनेस स्कुल मधून २०२० मध्ये पदवी प्राप्त केली.

बीड जिल्ह्यातील मांडवा या छोट्याशा गावात संतोष फड यांचे बालपण गेले. प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण सरकारी शाळेतून घेतले. पुढे २००५ मध्ये संगणक विज्ञान शाखेतून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे व्यावसायिक व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर शिक्षण. उदयोन्मुख अर्थव्यस्थेतील उद्योजकता (Entrepreneurship in Emerging Economies) या विषयात हार्वर्ड बिझनेस स्कुल मधून २०२० मध्ये पदवी घेणारे फड हे स्वतः उच्च विद्याविभूषित आहेतच पण समाजातील आर्थिक आणि तंत्रीकदृष्ट्या मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखील ही संधी खुली करण्यासाठी प्रयत्नशील असतात. याशिवाय संतोष फड यांनी टाटा फायनान्स कॅपिटल लिमिटेड, मॅग्मा, रिलायन्स तसेच एचबीएल ग्लोबल अशा बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये त्यांनी कार्य केले. नोकरी करत असताना करताना आपला भूतकाळ संतोष फड कधीही विसरले नाहीत. आपला भूतकाळ समाजातील कोणत्याही विद्यार्थ्याच्या वाट्याला येऊ नये याच प्रेरणेतून थिंक शार्प फाउंडेशन २०११ मध्ये सुरू झाले. आधी अर्धवेळ मग २०१८ पासून पूर्णवेळ आशा प्रकारे संतोष फड यांनी स्वतःला या समाजकार्यात वाहून घेतले आहे.
★ अधिक माहितीसाठी काही लिंक:-
◆फॉर्ब्समधील थिंक शार्प
https://www.forbesindia.com/article/covid19-frontline-warriors/how-this-ngo-brought-the-joy-of-learning-to-thousands-of-underprivileged-children-panindia-during-the-pandemic/67677/1
◆ शैक्षणिक दरी आणि मुद्दे
https://www.google.com/amp/s/feminisminindia.com/2020/09/23/education-great-equaliser-rural-urban-divide-persists-india/%3famp
◆थिंकशार्प वेबसाईट
www.thinksharpfoundation.org