कणखर कन्याकुमारी

बिकट परिस्थिती समोर भले भले नांगी टाकतात. संकटे उभी ठाकली म्हणजे आत्मविश्वासाचे अवसान गळून पडते. अनेकदा अपयशाच्या भीतीपोटी यशासाठी प्रयत्नच केले जात नाहीत. पण काही असामी यास अपवाद ठरतात. ही मंडळी फक्त परिस्थितीला अपवाद ठरत नाहीत, तर अपयशाला पाणी पाजत आपल्या यशाची मोहोर उमटवतात. अशाच एका कणखर महिलेची कहाणी आपण आज जाणून घेणार आहोत. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर महाराष्ट्राच्या एका छोट्या खेड्यातून सुरू झालेला तिचा प्रवास आज आयआयटीयन पर्यंत येऊन पोहोचला आहे.

‘कन्याकुमारी भिंगे’ हे फक्त नाव नाही एक प्रेरणादायी प्रवास आहे

सोलापूर जिल्ह्यातील अरळी हे कन्याकुमारी भिंगे यांचे मूळ गाव. वडील शेतकरी आणि आई गृहिणी त्यामुळे कौटुंबिक परिस्थिती तशी सर्वसामान्य. कन्याकुमारी यांना शिक्षणात फार रस नव्हता. पण वडिलांचा धाक असण्याने त्यांची शिक्षणातील कामगिरी दमदार राहिली. मोठी स्वप्ने, आयुष्याचे ध्येय, अभ्यासाचे महत्व याबद्दल आवश्यक मार्गदर्शन त्यांना मिळाले नाही. पण उपजत एक गोष्ट त्यांच्याकडे होती. बुद्धिमत्ता आणि प्रामाणिक कष्ट करण्याची तयारी. याच जोरावर त्यांनी आपले दहावीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे अभ्यासाप्रति ओढ वाढत गेली. वडिलांनी एक स्वप्न दाखवलं ‘दहावीत चांगले मार्क्स मिळवलेस तर उच्च शिक्षणासाठी शहरात पाठवीन’. एका खेड्यात वाढलेल्या मुलीसाठी ही गगनभरारी घेण्याची संधी होती. बस, दहावीपर्यंत हेच त्यांचं उद्धिष्ट होऊन गेलं. दहावीत ८८ टक्के गुण मिळवत कन्याकुमारी उत्तीर्ण झाल्या. मामांनी इलेक्ट्रॉनिक अँड टेलीकम्युनिकेशन डिप्लोमा घेण्याचा प्रस्ताव ठेवला. कन्याकुमारी यांनीही तो स्वीकारला. इथून त्यांच्या आयुष्याला नवं वळण लाभलं.

कन्याकुमारी यांचं प्राथमिक शिक्षण हे पूर्ण मराठी माध्यमातून झालं होतं. त्यामुळे इंग्रजीचा गंध हा फक्त एका विषयापुरता आणि त्या विषयाच्या परीक्षेपर्यंत मर्यादित होता. डिप्लोमाला प्रवेश घेतलं आणि कन्याकुमारी यांना भाषिक अडचणी तीव्रतेने जाणवू लागल्या. आजवर शाळेत हुशार म्हणून ओळख असणाऱ्या कन्याकुमारी यांना इंग्रजीचे दडपण आले. पण त्यावरही त्यांनी मात केली. बाजारातुन एक छोटी डिक्शनरी त्यांनी आणली. पुस्तकांवर ज्या ज्या शब्दांचे अर्थ माहीत नाहीत त्यावर त्यांनी अर्थ लिहिले. सर्व वाक्य मराठीतुन समजून घेतली आणि मग इंग्रजीतून त्याचा अर्थ लावला. पहिल्या सेमिस्टरला अवघड वाटणारी इंग्रजी आपसूकच त्यांना उमजू लागली. दुसऱ्या सेमिस्टरमध्ये त्यांनी उत्तम गुण देखील मिळवले. ठरवलं तर न्यूनगंड मग तो कोणताही असेना बाजूला सारता येतो हे कन्याकुमारी यांनी सदोहरण दाखवून दिलंय. डिप्लोमा करून पुढे बीटेक पूर्ण केलं. त्यानंतर कन्याकुमारी यांच्या आयुष्यातील तिसरा टप्पा सुरू झाला. त्यांचं लग्न झालं.

ठरवलं तर न्यूनगंड मग तो कोणताही असेना बाजूला सारता येतो

आयुष्यात योग्य जोडीदार लाभला, की प्रगतीच्या वाटेवर त्याची साथ आपल्याला लाभते. लग्नानंतर कन्याकुमारी मिस्टरांसह बंगलोर येथे गेले. सहा महिने नोकरी केली. नोकरी करताना पुन्हा एकदा ‘शिक्षणकडे’ वळावे असे त्यांना वाटू लागले. आणि त्यांनी आयआयटी दिल्लीत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय फार अवघड होता कारण कन्याकुमारी यांची मुलगी फक्त एक वर्षाची होती. या कठीण प्रसंगी त्यांना साथ दिली ती त्यांच्या मिस्टरांनी. कन्याकुमारी यांनी ही संधी सोडू नये म्हणून त्यांच्या मिस्टरांनी घरची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दाखवली. ‘एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते’, तसंच कन्याकुमारी यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ‘एका यशस्वी स्त्रीमागे एक पुरुष आहे’ असं म्हणावं लागेल.

कन्याकुमारी यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ‘एका यशस्वी स्त्रीमागे एक पुरुष आहे’

प्रश्न: आयआयटीच्या प्रवासातील अडचणी आणि त्यावर आपण कशी मात केली?
उत्तर
: माझी मुलगी फक्त एक वर्षाची असेल त्यावेळची ही घटना आहे. लॉकडाऊन संपला होता. मला आयआयटी दिल्ली मध्ये प्रवेश घ्यायचा होता. त्यावेळी मी आयआयटी दिल्लीला प्रवेश न घेण्याचा निर्णय घेणार होते. त्यावेळी सर्व अवघड वाटू लागलं होतं. पण माझ्या मिस्टरांना या निर्णयापासून मला परावृत्त केले. उलट सर्व जबाबदारी स्वतः स्वीकारण्याची तयारी दाखवत मला प्रोत्साहित केले. करिअर आणि शिक्षण याचे महत्त्व नव्याने त्यांनी मला पटवून दिले.त्यामुळेच आज मी एक आयआयटीयन आहे.

प्रश्न: तुमच्या या प्रवासात आवर्जून ज्यांनी नावे घ्यावी अश्या तीन व्यक्ती…
उत्तर
: पहिली व्यक्ती माझे वडील. मी शिक्षण घ्यावं. मोठं व्हावं यासाठी त्यांनी मला प्रत्येक पावलावर पाठिंबा दिला. प्रोत्साहन करत राहिले. ते जर नसते तर कदाचित मी उच्च शिक्षण घेता आलंच नसतं. दुसरी व्यक्ती, माझे मामा. उच्च शिक्षण घेताना जे मार्गदर्शन मला आवश्यक होते ते माझ्या मामांनी केलं. डिप्लोमासाठी कोणतं कॉलेज घ्यावं पासून सर्व मार्गदर्शन माझ्या मामांनी केलं. तिसरी व्यक्ती ही माझे मिस्टर आहेत. मला माझ्या करिअर मध्ये कायम प्रोत्साहन देण्यापासून ते आयआयटीमध्ये शिक्षण घेण्यापर्यंत त्यांनी सदैव मला साथच दिली. ‘मुलींनी करिअरपेक्षा कुटुंबाला वेळ देणे महत्वाचं असतं’ या प्रतिगामी विचारांना आमच्या कुटुंबाने कधीच जवळ केले नाही.

प्रश्न: तरुण मुलींना काय संदेश द्याल?
उत्तर
: आता विचार बदलण्याची गरज आहे. अजूनही ग्रामीण भागात काही प्रमाणात शहरी भागात मुली आपल्या जोडीदारावर अवलंबून असतात. यामुळे शिक्षण आणि इतर गोष्टींना महत्व दिले जात नाही. पण मी म्हणेन की, एकविसाव्या शतकात वावरताना, जिथे समानतेचा पुरस्कार केला जातो अशा काळात मुलींनीही आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक ते सर्व त्यांनी करायला हवं.

‘कन्याकुमारी भिंगे’ हे फक्त नाव नाही एक प्रेरणादायी प्रवास आहे. सोलापूर जिल्ह्यातील अरळी ते आयआयटी दिल्ली प्रत्येकाने जाणून घ्यावा असा हा प्रवास आहे.