भारतीय तरुणांना जगातील अनेक देशात आज संधी उपलब्ध आहेत. पण बऱ्याचदा विशेषता पाश्चिमात्य देशात या संधी साधण्यासाठी त्या त्या देशातील भाषा येणे आवश्यक असते. जागतिकीकरण आणि तंत्रज्ञान यांच्या संयुक्त विद्यमाने आज देशी भाषेसह इतर भाषा शिकणे कठीण नाही. पण या विदेशी भाषा शिकणे म्हणजे त्या भाषेच्या खर्चीक शिकवणीला जवळ करण्यासारखे आहे. उच्चभ्रूणच्या तुलनेत मध्यमवर्गीय तसेच खेड्यातील मुलांना तर या संधी परवडणे तसे कठीण. मात्र याच संधी सामान्य मुलांपर्यंत पोहचवण्यासाठी केदार जाधव हा अवलिया मागील काही वर्षांपासून प्रयत्न करतोय. जर्मन सारखी भाषा सर्वसामान्यांना विनामूल्य शिकता यावी यासाठी शिकवणी घेण्यापासून ही सुविधा सर्वांपर्यंत केव्हाही पोहचता यावी यासाठी स्वताचे युट्यूब चॅनल सुरू करण्यापर्यंत अनेक उपक्रम यांनी राबवले आहेत. जर्मन भाषा केदार जाधव कशी शिकवतात? त्यासाठी मिळालेली प्रेरणा. त्यांचा भारत ते जर्मनी हा प्रवास यावर आजच्या लेखाच्या निमित्ताने प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न.
केदार जाधव हे मुळचे महाराष्ट्रातल्या इचलकरंजीचे. पश्चिम महाराष्ट्राची कोल्हापुरी बोली बोलत इथल्या तांबड्या मातीतून थेट जर्मनीच्या म्युनिक या उच्चभ्रू आणि औद्योगिक नगरीपर्यंतरचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीच्या म. के. आठवले विद्यामंदीर या जिल्हा परिषदेच्या शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे कोल्हापुरातून स्टेट्सटिक टाइम डिझायनिंग मध्ये अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. शाळा कॉलेजात शिक्षण घेत असताना जर्मन शिकावी असं केदार यांना वाटत असे. पण शिक्षण संपल्यानंतर कुटुंब जबाबदारी, आयुष्यात स्थिरस्थावर होणे यात ही आवड मागे पडत गेली. त्यासाठी नोकरी करणे आवश्यक होते. आपल्या अभियांत्रिकीच्या शिक्षणाच्या जोरावर केदार एका नामांकित कंपनी मध्ये रुजू झाले देखील. पण जर्मन शिकण्याची आवड त्यांना कायम खुणावत राहिली. साधारण आठ वर्षापूर्वी विरंगुळा म्हणून त्यांनी जर्मन भाषेचे शिक्षण घेण्यासाठी सुरुवात केली. शालेय जीवनात मेरिटमध्ये येण्याची परंपरा त्यांनी इथेही कायम राखली आणि सुरवातीला पहिला, मग दुसरा असे करत जवळपास सहा पैकी पाच जर्मन भाषा शिक्षणाचे स्तर त्यांनी उत्तम गुण मिळवत पूर्ण केले. सहावा आणि शेवटचा स्तर पूर्ण भारतातून करण्याऐवजी थेट जर्मनीतुन करणे अधिक उपयुक्त ठरेल असे वाटू लागल्यावर त्यांनी थेट जर्मनी गाठण्याचे ठरवले. मग पुढे नोकरीसाठी त्यांनी व्हिसा जर्मन व्हिसा मिळवला आणि जर्मन भाषा पूर्णपणे आत्मसात केली.
हे शिक्षण घेत असताना केदार जाधव यांना अजून एक बाब प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, परदेशात असणाऱ्या नोकऱ्यांची संधी आणि त्याबाबत महाराष्ट्रातील शहरी प्राधान्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची याबाबत असणारे अनभिज्ञता. हीच पुढे इतरांना जर्मन भाषा शिकवण्यासाठी त्यांची प्रेरणा ठरली. वर म्हंटल्याप्रणे साधारण सुरुवातीचे चार वर्ष केदार यांनी उत्सुक विद्यार्थ्यांना जर्मन भाषेची शिकवणी दिली. तेही कोणत्याही आर्थिक मोबदल्याविना. पण हे पुरेसं नाही हे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी अजून एक निर्णय घेतला तो म्हणजे युट्यूब चॅनेल सुरू करण्याचा. ‘लर्न जर्मन विथ केदार जाधव‘ या चॅनलच्या मध्यमातून त्यांनी मराठी तसेच हिंदीतून जर्मन शिकवायला सुरुवात केली. आज या चॅनेलची प्रेक्षक संख्या चार लाखाहून अधिक आहे. तसेच जवळपास तीस हजार सबसक्रायबर्स आहेत. इथेही या व्यक्तीच्या निस्वार्थी भावनेचा प्रत्यय येतो. सदर व्हिडिओ पाहताना आपल्याला कोणत्याही जाहिरातींना सामोरे जावे लागत नाही. केदार यांनी आपले यूट्यूब अकाऊंटचे आर्थिकीकरणच केले नाही हे त्यामागील कारण आहे.
मुंबई – पुण्यातल्या मुलांप्रमाणे खेड्यापाड्यातील मुलांचे जर्मनीला जाऊन उच्चशिक्षण घेण्याच, नोकरी मिळवण्याचं स्वप्न पूर्ण व्हाव यासाठी ते प्रयत्नशील असल्याच सांगतात. त्यासाठी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून विशेष वेळ काढून ते थेट जर्मनीहून महाराष्ट्रातील विविध जिल्हापरिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना जर्मनी भाषेचे धडे देतात. हे सर्व करताना तारेवरची कसरत त्यांना करावी लागते. पण जेव्हा जिल्हापरिषदेच्या शाळेतील विद्यार्थी आपली ओळख जर्मन मधून करून देतात तेव्हा आपले कष्ट सार्थकी लागल्याचं समाधान मिळतं, असं ते सांगतात. आजही सकाळी लवकर उठून जर्मनीच्या शिकवण्या घेण, व्हिडीओ तयार करण अशी काम ते नेटानं करतात. नोकरी, शिकवणी आणि कुटुंबाला वेळ देणे हे सर्व करत असताना आता केदार जाधव स्पॅनिश देखील शिकत आहेत. पुढे जाऊन ते भारतीय शिक्षण व्यवस्थेत वाढत जाणारी दरी कमी करण्याची इच्छा देखील व्यक्त करतात.
आजवर अनेक विद्यार्थ्यांपर्यंत जर्मनीच्या ज्ञानाचा वसा पोहचवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या या अवलियाशी ‘टीम मॅक्झिमाने’ भारतीय आणि जर्मनी शिक्षण पद्धती, जर्मनी भाषा का व कशी शिकावी?, प्राथमिक शिक्षण आणि मातृभाषा, इंग्रजीचे उगाच वाढवलेले महत्व आणि जर्मनीतल्या संधी या विषयांवर सविस्तर चर्चा केली.
● मुलांनी जर्मन का शिकाव ?
सर्वात महत्त्वाच म्हणजे आज जर्मनीला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज आहे. पर्यायाने येथे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आहेत. या संधी पुढील १५ वर्ष तरी कमी होणार नाहीत. आज महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटींच्या घरात आहे, पण जर्मनीची लोकसंख्या अनेक वर्षांपासूनआठ कोटीच्या आसपासच आहे. त्यामुळे जर्मनीत मनुष्यबळाची खूप गरज आहे. आणि ही गरज आणखी काही वर्ष राहील.
दुसरं कारण, शिक्षण! जर्मनीमधल शिक्षण फार उत्कृष्ट आहे. सर्वसामान्य जर्मन नागरिक असो वा श्रीमंत व्यावसायिक साऱ्यांची मुले सरकारी शाळेतच जातात. यामागील कारण येथील सरकारी शिक्षण आणि खाजगी शिक्षण यात फारसा फरक आढळत नाही. जर्मनीमध्ये बरीच मंडळी इथे एम.एस विनामूल्य आहेत म्हणून येतात. पण मी म्हणेन फक्त इथल्या सरकारी विद्यापीठात शिक्षण मोफत आहे म्हणून येथे येऊ नका, तर येथील शिक्षण उच्च दर्जाच आहे म्हणून या.
● जर्मनी शिकताना ती कोणत्या भाषेतून शिकावी?
बरीच मंडळी इंग्रजीतून जर्मनी शिकतात. मला कळत नाही, दुसरी भाषा (मातृभाषे व्यतिरिक्त) शिकताना तिसऱ्या भाषेची मदत घेण्याचे नक्की प्रयोजन काय? जी तुमची भाषा नाहीये त्या भाषेतून जर्मन शिकणे हा मूर्खपणा आहे. जर्मनी ही जर्मनीतून किंवा तुमच्या भाषेतून शिकावी. मातृभाषेत ती अधिक चांगल्या पद्धतीने समजते.
● जर्मनी आणि मराठीत काही साम्य आहे का?
जर्मनी आणि मराठीत बरंच साम्य आहे. उदाहरणार्थ मराठीतील ‘तो, ती, ते’ या प्रत्ययांचा जर्मनीत ‘ईहर, झी, एसस्’ असा उल्लेख आढळतो. मराठीत ज्याप्रमाणे एकेरी उल्लेख करताना ‘तो’, तर आदरार्थी उल्लेख करताना ‘तुम्ही’ वापरलं जातं त्याप्रमाणे जर्मनीत या दोन्हीसाठी अनुक्रमे ‘दु’ आणि ‘एसस्’ अशी वेगळी प्रत्यय वापरली जातात. यामुळेच जर्मनी मराठीतून शिकण जास्त सोयीस्कर असत.
● आपलं प्राथमिक शिक्षण कोणत्या माध्यमातून झालं? इंग्रजी शिक्षणाबद्दल आपलं मत काय?
माझं शिक्षण जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमातून झालं आहे. मला असं वाटतं, भारतात इंग्रजीला उगाच अधिक महत्व दिल जातं. मी जर्मन शिकत असताना आणि सध्या स्पॅनिश शिकताना अस जाणवल की इंग्रजी ही व्याकरणाच्या दृष्टीने खूप मर्यादित भाषा आहे आणि त्यात अनेक चूका आहेत. यातल्या अनेक गोष्टी आपल्याला रट्टा मारून शिकवल्या जातात. या भाषेतल्या अनेक गोष्टी तशा का आहेत हे आपल्याला कधीच माहिती नसत. चांगली इंग्रजी येण ठीक आहे. ती काळाची गरज आहे. पण आपलं शिक्षण मातृभाषेतून न होता इंग्रजीतून झाल्याने विशेष फरक पडतो अस मला अजिबात वाटत नाही. जर्मनी मध्ये इंग्रजीला विशेष महत्त्व नसत. इथे प्राथमिक शिक्षण जर्मनी भाषेतच दिल जात. पहिली दुसरीला तर इंग्रजी हा विषयच नाहीये. १९९०च्या आधी तर जर्मनीच्या अभ्यासक्रमात सुद्धा इंग्रजी नव्हतं. इथे अशी काही जर्मन लोक आहेत ज्यांना आजही इंग्रजी येत नाही किंवा अगदीच तोडकिमोडकी इंग्रजी येते. विद्यार्थ्याला प्राथमिक शिक्षण मातृभाषेतुन दिलं तर ते आत्मसात करणे लवकर जमतं जे जर्मनीमध्ये दिल जातं. इथे आपल्यासारखा इंग्रजीचा बागुलबुवा केला जात नाही.
● भारतीय शिक्षण व्यवस्था – जर्मनी शिक्षण व्यवस्था यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो?
जर्मनीमध्ये भारतासारखा शिक्षणाचा बाजार (शिक्षणाच व्यापारीकरण) झाला नाहीये. म्हणजे जर्मनीमध्ये शाळा म्हणजे सरकारी शाळा हे समीकरण आहे. सरकारी शाळा म्हणजे वाईट असतात असा समज इथे नाहीये कारण इथली सत्यपरिस्थिती वेगळी आहे. सर्वसामान्य जर्मन नागरिक असो वा श्रीमंत व्यावसायिक साऱ्यांची मुले सरकारी शाळेतच जातात. जर्मनीत सर्वांना संधी देखील सारख्या मिळतात. इथे डॉक्टर, इंजिनिअर यांचा पगार आणि साधी चावी बनवणारा, वाहन चालक यांच्या उत्पन्नात फार तफावत आढळत नाही. येथे श्रमाला किंमत आहे. कारण शिक्षण सर्वांना समान मिळालेलं असतं. जर्मनीत प्राथमिक शिक्षणापासून पीएचडी पर्यंत शिक्षण मोफत आहे. तसेच येथील विद्यार्थ्यांना पुस्तक, जेवण मोफत दिल जातं. त्यांना महिन्याला २०० युरो किंडरगेल्ड (किंडर – लहान मुलं गेल्ड -पैसे) देण्यात येतात. भारतात तसं नाहीये लहान गटातल्या मुलांची फी लाख दीड लाख असते. त्यांना मग जगातल्या विविध भाषा शिकवल्या जातात. आणि जिल्हा परिषदतेल्या शाळेतील मुलांना अशी काही संधी नसते. आणि तरीही पुढे या मुलांची एकमेकांशी तुलना केली जाते आणि ‘सरकारी शाळेत जाणाऱ्यांना काहीच येत नाही’ असं ठरवलं जातं. मी हीच दरी दूर करण्यासाठी काम करायचं असं ठरवले आहे.
● भारतीय शिक्षणपद्धतीने जर्मन शिक्षण पद्धतीकडून कोणती गोष्ट शिकायला हवी?
भारताच्या नव्या शिक्षण धोरणानुसार मुलांनी विविध क्षेत्रात आपली आवड बघून जावं किंवा काय शिकावं हा प्रकार जर्मन शिक्षण पद्धतीतून घेतला आहे. पण ते करताना भारतीय शिक्षण पद्धतीची मांडणी बदलणे आवश्यक आहे. श्रमाला किंमत मिळायला हवी. त्यासाठी तशी शिक्षण व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. दुसरं म्हणजे भारताने जर्मनी प्रमाणे केजी टू पीजी हे शिक्षण मोफत करावं. जर्मनीत शिक्षण हा बालकांचा मूलभूत अधिकार केवळ कागदावर नसून त्याची तशीच कठोर आंमलबजावणी देखील होते. जर्मनीत मुलांना योग्य कारण न सांगता शाळेत पाठवलं नाही तर पोलीस घरापर्यंत येतात. एवढं ‘शिक्षण’ या मूलभूत अधिकाराचे रक्षण इथे केले जाते. भारतातही अस व्हायला हवं. आणि तिसरं आणि महत्वाचं, भारतात प्राथमिक शिक्षण हे जर्मनीप्रमाणे मातृभाषेतुन द्यायला हवं. भारतात हा निर्णय पूर्वी होता आता पुन्हा तो अमलात आणायला हवा. तेव्हाच भारतातील इंग्रजीचे अतिमहत्त्व कमी होईल आणि इतर संधी दिसू लागतील.
कसा वाटला हा लेख आम्हाला जरूर कळवा. शिवाय केदार सरांचे हे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. मग मंडळी आता शिकणार आहात ना जर्मनी केदार सरांसोबत? पहिल्या व्हिडिओसाठी खलील लिंकवर क्लिक करा.