‘सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलांनी उच्च शिक्षण घ्यावं. त्या शिक्षणाच्या जोरावर शहरात नोकरी मिळवावी. तिथून पुरेसा अनुभव ग्रहण करत परदेश गाठावे’ ही प्रोसेस म्हणजे आपल्याकडे प्रगतीचे लक्षण मानलं जातं. हा प्रवाह असाच असायला हवा. एखादा शेतकरी कुटुंबातील तरुण उच्च शिक्षण घेत शहर गाठत असेल. तिथे मिळवलेल्या अनुभवाच्या साहाय्याने परदेश गाठता येताना पुन्हा शेतीकडे वळला म्हणजे ‘अधोगती’ हे आपण ठरवून टाकतो. हा विरुद्ध दिशेचा प्रवास करणे सोपे नसते. पण असेच प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात आज हजारो भारतीयांच्या डोळ्यासमोर आदर्श उभा केलाय पुण्याच्या ‘हांगे बंधूनी’. सत्यजित हांगे आणि अजिंक्य हांगे या दोन बंधूनी फक्त समाजाच्या दृष्टीने असलेला ‘अधोगती’चा मार्गच चोखाळला नाही, तर त्या मार्गावर जात यशाचं नवं उदाहरण उभं केलंय. शेतीसाठी आपली तीन लाखांची नोकरी सोडलेल्या या बंधूंच्या कंपनीची मासिक उलाढाल आज काही कोटींत आहे. ध्येय, चिकाटी आणि जोडीला आवश्यक शिक्षण असलं म्हणजे यश थेट पताळातून देखील खेचून आणता येतं. त्यामुळे ठरवलं तर कृषिप्रधान देशाच्या कृषिक्षेत्रातून यश मिळवणे तसे कठीण नाही हे या बंधूंनी सदोहरण स्पष्ट केलंय. आज याच बंधूंची आणि त्यांच्या ‘टू ब्रदर्स ऑरगॅनिक फार्म‘ च्या प्रवासाची कहाणी आपण जाणून घेणार आहोत.
चिकाटी आणि जोडीला आवश्यक शिक्षण असलं म्हणजे यश थेट पताळातून देखील खेचून आणता येतं
…आणि आम्ही नोकरी सोडली
सत्यजित हांगे आणि अजिंक्य हांगे दोघेही सर्वसामान्य कुटुंबातील बंधू. सत्यजित थोरले तर अजिंक्य हे त्यांचे धाकटे भाऊ. जी अपेक्षा सर्वसामान्य बापाला असते तीच अपेक्षा हांगे बंधूंच्या वडिलांची देखील होती. यासाठी आपल्या दोन्ही मुलांना त्यांनी शहरात, पुण्यात पाठवले. शेतीतून मिळणारं कमी उत्पन्न, अवेळी येणार पाऊस, दुष्काळ, याहून अधिक विदारक म्हणजे वर्षाचे बाराही महिने राबून देखील मालाला न मिळणार हमी भाव यातुन सावरत कुटुंब चालवणं तसं कठीण त्यामुळे ‘तुम्ही आपली नोकरी करा आणि मोठे व्हा’ असचं मत हांगे कुटुंबियांचं होतं. सत्यजित आणि अजिंक्य यांनी आपल्या वडिलांची ही अपेक्षा शिरसावंद्य मनात कसून अभ्यास केला. वाणिज्य शाखेत पदवी आणि पूढे दोन्ही भावांनी मार्केटिंग विभागातून आपलं एमबीए पूर्ण केलं. आपल्या बौद्धिक आणि शैक्षणिक पात्रतेच्या जोरावर त्यांनी बँकांमध्ये जॉब करायला सुरुवात केली. एक क्षण असा आला, की दोन्ही बंधुचं मासिक उत्पन्न ३ लाखांच्या वर गेलं. अर्थात एव्हाना कुटुंबाला सुगीचे दिवस सुरू झाले होते. दोघांनी आपल्या आयुष्यातील जोडीदार निवडले होते. सगळं काही ‘सेफली’ सुरू असताना यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. आयुष्यात पैसे कमावता येतील, पण त्या पैशाने सुखी होता येतंच असं नाही. हांगे बंधूंचं सुख गावाच्या मातीत दडलेलं होतं. या मातीचा गंध त्यांना वारंवार खुणावत होता. अखेर तो क्षण आला जेव्हा दोघांनीही नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सोपा नव्हता. ‘कशाला एवढी चांगली नोकरी सोडताय?, शेतीकरून मिळणार? स्वतःच्या पायावर स्वतःच कुऱ्हाड का मारून घेताय?’ या न अशा अनेक प्रश्नांना केराची टोपली दाखवत आणि ‘आता शेती करायची’ म्हणत दोघांनी नोकरीवर पाणी सोडले. पण शेती म्हणजे सोपं काम नव्हे. व्यवसायाहून अधिक जोखीम या क्षेत्रात असते हेच खरे. हांगे बंधूंना या जोखमीचे चटके अद्याप बसायचे होते.
आयुष्यात पैसे कमावता येतील, पण त्या पैशाने सुखी होता येतंच असं नाही.
कधी ऑप्शन ‘बी’ ठेवला नाही
२०१२ मध्ये हांगे बंधूनी शेत गाठले. हे साल टू ब्रदर्सच्या पायाभरणीचे. असे जरी असले तरी ‘आपल्याला काय करायचं आहे? शेतीतून किती उत्पन्न मिळेल? यशस्वी शेतकरी होऊ शकतो का?‘ यातील एकाही प्रश्नचं उत्तर त्यांच्याकडे नव्हते. असलंच, तर एक उद्धिष्ट होतं ‘शेतकरी व्हायचंय’! पारंपरिक पद्धतीने शेती सुरू केली. सुरवातीला ऊस हे खरीप पीक आणि पूढे डाळिंबासारखी बागायती शेती हे तरुण करू लागले. अवघ्या दोन वर्षात ‘आपला निर्णय चुकला की काय?’ असा प्रश्न त्यांना पडला. लावलेल्या डाळिंबाला तेल्या झाला. झालं शेतीतून येणारं कमी उत्पन्न त्यात हा डोळिंबाला झालेला रोग. या रोगाने त्यांना त्यांच्या शेतीकडे वळण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा लागत होता. तेल्याने डाळिंबाला रोग आला, पण त्यांचा आत्मविश्वास तो पोखरू शकला नाही.
‘आम्ही शेतात उतरण्यापूर्वीच ठरवलं होतं. ऑप्शन बी ठेवायचा नाही. त्यामुळे मागे वळण्याचा प्रश्नच नव्हता. शेतीतून पोटापाण्यापुरता पैसा मिळाला तरी बेहत्तर‘, असं आज अजिंक्य हांगे मोठ्या अभिमानाने सांगतात. शेतीतून येणाऱ्या उत्पन्नाने अगदीच आणीबाणी निर्माण झाली, तर प्रसंगी आपल्या मुलांना घरीच शिकवण्याची तयारी यांनी ठेवली होती. त्यावेळची त्यांची चिकाटी आणि काळ्या मातीवर असणारं प्रेम आज फळलं आहे, असं म्हटलं तर वावगे ठरू नये.
त्यावेळची त्यांची चिकाटी आणि काळ्या मातीवर असणारं प्रेम आज फळलं आहे, असं म्हटलं तर वावगे ठरू नये
कर्जाची नव्हती साथ
आजही राज्यात दररोज शेतकरी आत्महत्या घडताहेत. या आत्महत्येमागे प्रमुख कारण असते ‘करता न आलेली कर्जाची परतफेड’. शेतकरी आत्महत्याग्रस्त असणाऱ्या आपल्या राज्यात हांगे बंधूचा प्रवास एकही रुपयांचे कर्ज न घेता केला. स्वतः वाणिज्य शाखेतील पदवीधर आणि मार्केटिंग मध्ये एमबीए केलेल्या दोघांनीही मिळालेलं उत्पन्न तेवढं शेतात पून्हा गुंतवल. या गुंतवणुकीची चांगली मशागत केली आणि त्यातून उत्तम आर्थिक पीक काढलं.
पारंपरिक शेतीमुळे आपण आपल्याच मातीला मारतो आहोत हे त्यांना आढळून आलं
रोपट्याचं वटवृक्ष झाला
‘कधीकाळी शेती सोडून द्यावी लागतेय की काय?’ या प्रसंगातून सावरत आज मिलियन डॉलर कंपनी उभी करणं सोपं नव्हतं. पारंपरिक शेतीमुळे आपण आपल्याच मातीला मारतो आहोत हे त्यांना आढळून आलं. दोघांचं वाचन मुबलक त्यामुळे आपल्या पुस्तकांनाच आपले मार्गदर्शक बनवत त्यांनी ऑरगॅनिक अर्थात जैविक पद्धतीने शेती सुरू केली. गाय-बैलांच्या मलमूत्र शेतात खत म्हणून वापरले जाऊ लागलं आणि यावर वाढणारा चारा गाय-बैलांसाठी वापरला जाऊ लागला. अशाप्रकारे सुरू झाला तो एका जैविक शेतीचा प्रवास. पुढे ही जैविक शेती ‘टू ब्रदर ऑरगॅनिक फार्म’ म्हणून नावारूपाला आली. २०१२ नंतर दोन वर्षात २०१४ मध्येच आपल्या निर्णयाचा फेर विचार दोघांना करावा लागला होता. २०१६ मध्ये हा सर्व बॅकलॉग भरुन काढत कंपनी नावारूपाला आणली. रासायनिक खतांचा वापर करत पिकलेले पदार्थ बाजारात मोठ्याप्रमाणात विकले जात असताना, कोणतेही रासायनिक प्रक्रिया न केलेले विविध ऑरगॅनिक प्रॉडक्ट आज टू ब्रदर ऑरगॅनिक फार्म त्यांच्या ग्राहकांना देते आहे. पुण्याच्या इंदापूर मध्ये ३० एकरात पसरलेली ही कृषी कंपनी आज १०० हुन अधिक कुटुंबाचे पोट भरत आहेत. तसेच हजारो शेतकऱ्यांना यांच्या कंपनीतून अप्रत्यक्ष रोजगार मिळतो आहे. एकेकाळी लाखांची सोडलेली नोकरी पासून ते आज कोट्यवधींची उलाढाल असणारी कंपनी हा प्रवास सहज नाही तर अनेक संकटांना सामोरं जात घडला आहे.
गुंतवणुकीची चांगली मशागत केली की, त्यातून उत्तम आर्थिक पीक काढता येतं
आभाळाला गवसणी, तरी पाय जमिनीवर
आपण कितीही मोठे झालो, तरी या समाजाचे देणे लागतो याची जाणीव दोघांनाही आहे. स्वतःच्याच कंपनीत सुरवातीच्या काळात साथ देणाऱ्या लोकांना यांनी दशलक्ष रुपयांचे भाग देऊ केले. आज त्यांची किमंत कोटींत आहे. याशिवाय वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयात जाऊन विद्यार्थी-तरुणांना प्रोत्साहित करणे आजही ही मंडळी आवर्जून करतात. आपलं वाचन, शिक्षण आपण कसं शेतीत वापरायला हवं? याविषयी जनजागृती करण्याचं कार्यही हे करतात. आभाळाला गवसणी घालणाऱ्या या दोन्ही बंधूंचे पाय आजही जमिनीवर आहे हे पाहून समाधान लाभतं.
उत्तम परतावा देणारी गुंतवणूक
‘स्वतःत गुंतवणूक करा. स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक तुम्हाला कायम उत्तम परतावा देणार. स्वतःला काय आवडतं? आपल्या जमेच्या बाजू कोणत्या? या सर्वांचा शोध घ्या. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपल्या आवडत्या क्षेत्रात कार्य सुरु केल्यानंतर त्यावेळी कोणताही पर्याय डोळ्यासमोर ठेवू नका. यश तुमचंच आहे’,
हा अजिंक्य हांगे यांचा तरुणांना संदेश आहे.
आपणही यांच्या कंपनीच्या संकेतस्थळाभेट द्यावी. रासायनिक प्रोडक्टच्या जगतात यांच्या जैविक उत्पादनाचा जरूर आस्वाद घ्यावा.
Two Brothers Organic Farming: https://twobrothersindiashop.com/