शिक्षणाची नवी पहाट

मुस्तफा केमाल अतातुर्क म्हणतात,“चांगला शिक्षक हा मेणबत्तीसारखा असतो. तो इतरांचे मार्ग उजळवण्यासाठी स्वतःचा वापर करतो.” त्यामुळे शिक्षण देणे हे एक उदात्त कार्य ठरते. हे काम करण्याची जबाबदारी प्रत्येक शिक्षकाची आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञान कक्षा अधिक रुंदावतात. विद्यार्थ्यांसाठी शिक्षक हा एक मार्गदर्शक असतो, तसेच ते एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व देखील असते. आपल्या देशाला शिक्षण क्षेत्राचाही मोठा इतिहास आहे. अनेक महापुरुष, तितक्याच स्त्रिशक्तींनी हा भारतीय शिक्षणाचा लढा जगभर पोहचवण्यासाठी मोठे प्रयत्न केले.

शिक्षण श्रेत्रातील महापुरुषांच्या यादीत अग्रक्रमाने येणारं नाव म्हणजे, भाऊराव पायगौंडा पाटील. भाऊरावांचा जन्म कोल्हापूर मध्ये झाला असून कुंभोजी या गावी जैन घरात ते लहानाचे मोठे झाले. भाऊरावांचे प्राथमिक शिक्षण कुंभोज, दहिवडी, विटे येथुन पुर्ण केले. पुढील शिक्षण कोल्हापूरमधील राजाराम हायस्कूलमध्ये पूर्ण केले. भाऊराव पाटील म्हणजे शिक्षणाची नवी पहाट. ते फक्त शिक्षणप्रसारकच नव्हते, तर मराठी समाजसुधारक देखील होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षण गंगा पोहोचावी म्हणुन त्यांनी रयत शिक्षण संस्थेचा पाया रचला. आपल्या नविन्यपुर्ण कल्पनेच्या जोरावर भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘कमवा व शिका’ ही योजना सुरू केली. शिक्षणाचे महत्व हे आपल्याला आता कुठे कळतंय. स्वातंत्र्यपूर्वीचा काळ असेल वा भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा काही काळ आपल्याकडे शिक्षणाला दुय्यम स्थान दिले गेले. स्वातंत्र्याची पंचाहत्तरी गाठुन देखील मुलींनी चूल व मूल हेच पहावे हा समज समुळ नष्ट झालेला नाही. कुटुंबातील कर्ता पुरुषच शिक्षणाला महत्त्व देत नसेल, तर तिथे स्त्री शिक्षणाची काय बात! म्हणुनच भाऊराव म्हणत, ‘घरात एक व्यक्ती शिकली, तर अख्खं कुटुंब शिकेल. तसंच समाजातील एक व्यक्ती शिकली तर संपूर्ण समाज शिकेल.’ याच विचारधारेने किमान आपला समाज, आपलं गाव शैक्षणीकदृष्ट्या बळकट करून जगभर शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी भाऊरावांनी प्रयत्न केले.

त्यांच्यावर राजर्षी शाहूमहाराजांच्या विचारांचा, त्यांच्या कर्तृत्वाचा प्रभाव होता. याच काळात त्यांनी मदवानमास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर अशा मंडळींसोबत दुध गाव येथे ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ या नावाने वसतिगृह सुरू केले. भाऊरावांनी देशात स्त्री शिक्षणाची बिजे रोवणाऱ्या महात्मा फुले यांना गुरू मानूनच शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. या शैक्षणिक प्रसारामुळे लोकांना शिक्षणाचे महत्त्व कळू लागले. देशाचा, समाजाचा, कुटुंबाचा आणि पर्यायाने स्वतःचा विकास करायचा असेल तर शिक्षणाला पर्याय नाही. भाऊरावांना महाराष्ट्रातील जनतेने कर्मवीर ही पदवी देत त्यांच्या कार्याचा गौरवच केला. भारतीय केंद्र सरकारने कर्मवीर भाऊराव पाटलांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाला शिक्षणाची आवड निर्माण करुन देणे व ती वाढवणे, गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे अशा सर्व विद्यार्थ्यांच्या घरात शिक्षणाची ज्योत पेटवण्याचे कार्य रयत आजही करते आहे. भाऊरावांनी लाखो मुलांच्या मनात ज्ञानाची ज्योत पेटवून अख्ख जग प्रकाशमय केलं.
अशा या ज्ञान ज्योतीस मानाचा मुजरा!

शिक्षणाचा दिवा प्रत्येक घरी लावा,
अज्ञानाचा अंधकार दूर होईल…
काळोखावर अशी मात करा,
अंधाराशी लढताच विकास तुमचा होइल…