आपण सुंदर दिसावं, आपण आपल्या त्वचेची काळजी घ्यावी, आपलं सौंदर्य चारचौघात उठून दिसाव असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं. त्यानुसार स्त्रिया सर्व पातळीवर आपल्या त्वचेची सतत काळजी घेतात. या संबंधित असणारे अनेक प्रॉडक्ट मात्र खिशाला परवडणारे नसतात. यावरच पर्याय म्हणून स्त्रियांसह पुरुषांनाही खिशाला परवडेल, अशा स्वदेशी सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तुंचा स्टार्टअप ‘मानसी महाजन‘ या तरुणीने सुरू केला आहे. त्याच नाव कडलीस्किन (Cuddlyskin).
बाजारात कॉस्मेटिक गोष्टी तशा महागच असतात. पैशांच्या किंमती प्रमाणे त्या तस कामही करतात. त्यात वापरलेल्या पदार्थांवर ते अवलंबून असत. स्वस्त प्रोडक्ट्समध्ये बऱ्याचदा अनेक महागड्या प्रोडक्ट्सच्या तुलनेत कमी दर्जाचे पदार्थ असतात. यामुळे महागडे पण असरदार असे प्रोडक्ट्स सामान्य स्त्रिया किंवा पुरुष यांना घेता येत नाहीत. सामान्यांच्या खिशाला परवडणारे महागड्या परदेशी प्रोडक्ट्स सारखे असरदार प्रोडक्ट्स स्त्रिया घेऊं शकल्या तर? याच विचाराने सुरू झालं कडलीस्किन हे स्टार्टअप. जळगावच्या मानसी महाजनने हे स्टार्टअप सुरू केलं. तिच्याकडे आजच्या घडीला ३५ पेक्षा अधिक प्रोडक्ट्स असून, ते संपूर्णतः स्वदेशी पदार्थ, जास्तीत जास्त नैसर्गिक आणि कमीत कमी रासायनिक पदार्थापासुन तयार करण्यात आले आहेत.
कॉलेजचं शिक्षण घेत असतानाच आपल्याला व्यवसाय करायचा आहे हे मानसीने निश्चित केलं होत. कशाचा व्यवसाय करावा? या प्रश्नाचं उत्तर शोधायला तिला अधिक विचार करावा लागला नाही. मानसीच्या घरीच कॉस्मेटिक प्रोडक्ट्स याची पार्श्वभूमी असल्याने तिला या क्षेत्रात लहानपणापासून विशेष आवड होती. आई ब्युटीशियन असल्याने याच क्षेत्रासंबंधित बहुमोल माहीती तिला बालपणापासून मिळत गेली. पुढे या क्षेत्रात काही करतात येईल का हा विचार तिने सुरू केला. आणि सामान्यांच्या खिशाला परवडतील, महागड्या प्रोडक्ट्सच्या तोडीची प्रोडक्टस तयार करण्याची कल्पना तिला सुचली.
तिने पदवी शिक्षण सुरू असतानाच कॉस्मेटिक क्षेत्रात एक डिप्लोमा केला आणि संशोधन करायला सुरुवात केली. फेस मास्क (शीट मास्क) तयार करण्यापासून मानसीने व्यवसायाची सुरुवात केली. यासाठी असणारी पॅकिंग ही तिने स्वतःच केली आणि साध्या कागदी पॅकेजिंगच्या जोरावर तिने व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला शीट मास्क या प्रकारात मानसीने आईच्या ब्युटी पार्लर मध्ये येणाऱ्या स्त्रियांना प्रोडक्ट वापरायला दिले याला तिला चांगला प्रतिसाद मिळाला. नंतर तिने स्वतच्या सोशल मीडिया अकाउंटवर प्रोडक्ट द्यायला सुरुवात केली. तिथेही प्रतिसाद उत्तमच होता. यांनतर तिने लीप बाम, बॉडी स्क्रब, लिप स्क्रब या प्रकार तयार केले आणि यालाही तसाच प्रतिसाद मिळाला. पुढे कॉलेज मध्येच असतानाच असलेला हा प्रतिसाद पाहून कॉलेजपूर्ण झाल्यावर तिने तिचे संपूर्ण लक्ष याच क्षेत्रावर केंद्रित केले. विविध शहरात प्रदर्शनात (exhibition) स्टॉल लावत, नवे प्रॉडक्ट तयार करत व्यवसाय वाढवला. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहत तिने डिसेंबर २०२१ मध्ये कडलीस्किन नावाची कंपनी सुरू केली. फेब्रुवारी २०२२ मध्ये मानसीने व्यवसायासाठी वेबसाईट देखील सुरू केली. पुढे तिने कंपनीच्या नावाचा ट्रेडमार्क सुद्धा घेतला आहे.
सुरुवातीचा कठीण फॉर्म्युला….
हा प्रवास तसा कठीणच होता. कारण कॉस्मेटिक पदार्थ तयार करताना विविध फॉर्म्युला त्यात वापरावे लागतात. त्याची रीतसर विविध प्रकारच्या त्वचेवर टेस्ट घ्यावी लागते आणि पुढे आकर्षक अशा पॅकेजिंग सह ते पुढे पाठवावे लागतात. यातच प्रॉडक्ट व्यवस्थित पत्त्यावर पोहोचण्यापासून ते काचेच्या बाटल्यांमध्ये असल्यास त्याची काळजी घेण्यापर्यंत अनेक लहानमोठ्या पातळीवर असणारी आव्हान मानसीने समर्थपणे सांभाळली. पॅकेजिंग, टेस्टिंग, फॉर्म्युला या क्षेत्रात असा कुठलाही अनुभव नसतानाही, तिने आपले संशोधन सोडले नाही. सुरुवातीला डिप्लोमा करत सर्व प्रोडक्ट्सचे फॉर्म्युला तिने समजावून घेतले. शीट मास्कच्या यशस्वी प्रतिसादानंतर पुढे तयार करण्यात आलेल्या प्रत्येक प्रोडक्ट मध्ये मानसीने शास्त्रशुद्ध पद्धतीने स्वतःचे फॉर्म्युला वापरले. यानंतर ते प्रोडक्ट्स तयार करून ५० विविध लोकांवर त्याची चाचणी केली. त्यांनतरच तिने बाजारात आपले प्रोडक्ट्स आणले. मानसी आजही अगदी याच पद्धतीने प्रयोगशाळेत फॉर्म्युला टेस्ट करून, प्रॉडक्टची टेस्टिंग घेऊनच ते बाजारात आणते. विविध फ्लेवर्स, ब्युटी प्रोडक्ट मधील रंग, त्याच्या शेड्स, कोणता रंग कोणत्या त्वचेवर जास्त शोभून दिसेल या साऱ्या किचकट कामात आईचा ब्युटिशियन म्हणून असलेला अनुभव आणि माझा अनुभव कामी आला अस मानसी प्रतिपादन करते. आतापर्यंत कुठल्याही प्रॉडक्टसाठी तिने प्राण्यांवर टेस्टिंग किंवा प्रयोग न केल्याचं मानसी अभिमानाने सांगते.
व्याव्यसायिका म्हणून जडण- घडण…
तिच्या या प्रवसात तिला घडवणारा प्रसंग २०२१च्या लॉकडाऊनमध्ये घडल्याचं सांगते. लॉकडाऊन मध्ये मानसीला आसाम येथील गुवाहाटी वरून ऑर्डर आल्या. अशा सलग सात ऑर्डर होत्या. मात्र तिथे प्रचंड पाऊस असल्याने आणि इतर कारणांनी प्रॉडक्ट पोहोचवणाऱ्या कंपनीकडून त्या ग्राहकांपर्यंत पोहोचल्या नाहीत. याचे सर्व पैसे मानसीला भरून द्यावे लागले. मात्र तरीही तिने हिम्मत न हारता या अनुभवातून शिकून डिलिव्हरी पार्टनर, पॅकेजिंग यात बदल केले. ‘आपण उद्योजिका असताना, असे लहान मोठे धक्के खाऊनच आपली जडण घडण होते आणि आपण पुढे जात असतो’, हसत हसत मानसी सांगते. या अनुभवांना गुरू मानून, न घाबरता. न थकता पुढें जात व्यवसाय करायचा सल्ला देते ती तरुणांना देते.
जळगाव ते पॅन इंडिया व्हाया राजस्थान…
जळगावात कडलीस्किन अंतर्गत विविध प्रोडक्ट्स घरीच तयार करत त्याची विक्री करण्याची साखळी जस जशी वाढत गेली तसा हा पसारा आणखी मोठा झाल्याचं मानसी सांगते. घरी स्वच्छतेच्या कारणामुळे प्रोडक्ट तयार करण कठीण जाऊ लागलं आणि मानसीने राजस्थान इथे एक जागा भाडे तत्त्वावर घेत तिथे ही प्रोडक्ट तयार करायला सुरुवात केली. दिवसेंदिवस ग्राहकांच्या मिळणाऱ्या यशस्वी प्रतिसादा मुळे महाराष्ट्रासह संपूर्ण भारत भर तिला ऑर्डर मिळत आहेत.
दोन हजारी सुरुवात…. आणि अनेकांना रोजगार
कडलीस्किन या स्टार्टअपची सुरुवात केवळ दोन हजारात करण्यात आली. मानसी सांगते, ‘अनेकांना हे ऐकून आश्चर्य वाटत, पण ही गोष्ट खरी आहे’. हा स्टार्टअप सुरूवातीला घरातूनच सुरू झाल्याने मानसीने अगदी मोजून मापून पैसे वापरले. जस लोकांचा प्रतिसाद येत गेला तस तस मानसीने अनेक नवे प्रॉडक्ट, पॅकेजिंग या साऱ्या गोष्टींसाठी तिने कॉलेजच्या दिवसांत इंटर्नशिप करत कमावलेल्या पैशांचा वापर केला. पुढे राजस्थान इथे प्लांट उभारण्यासाठी घरून केवळ वीस टक्के पैशांची मदत घेतली. आज तिच्या या प्लांट मध्ये चार लोक काम करत आहेत. तर जळगाव येथे दोन स्त्रिया काम करत आहे. मानसीने तिच्या जिद्दीमुळे अवघ्या २५ व्या वर्षी रोजगार निर्माण केले आहेत.
नैसर्गिक प्रॉडक्ट नैसर्गिक (ऑरगॅनिक) मार्केटिंग
सुरुवातीला कडलीस्किन स्थपना करताना मानसीने ते प्रॉडक्ट अधिकाधिक नैसर्गिक पदार्थ वापरून तयार केले जातील यावर भर दिला. तसच तिने सोशलमीडिया मार्केटिंग प्रकारातही कुठल्याही प्रकारचे पैसे न देता ऑरगॅनिक पद्धतीने मार्केटिंग केली. लोकांचा खरा प्रतिसाद पुढे झालेली माऊथ पब्लिसिटी आणि तिने शिकलेल्या काही मार्केटिंग स्किल्स या जोरावर तिने सोशल मीडियावर आपला व्यवसाय वाढवला. मात्र या साऱ्या मार्केटिंग गिमिक्स मध्ये तिच्या बहिणीने दिलेले अनेक सल्ले तिला कामात आल्याचं ती सांगते. बहिणीने सोशल मीडिया अकाऊंट कस सांभाळावं पोस्ट कशा असाव्यात असे अनेक बारीक सारीक पण महत्वाचे सल्ले उपयोगी आले अस ती सांगते. याच जोरावर तिने नवी वेबसाईट देखील सुरू केली आहे.
व्होकल फॉर लोकल आणि स्वदेशीचा नारा
आपले विविध प्रोडक्ट्स तयार करण्यासाठी मानसी लोकल ठिकाणाहून कच्चा माल घेते आणि त्यावर प्रक्रिया करते. तिचे केवळ पॅकेजिंग हे चीन मधून येते मात्र लवकरच तिचे पॅकेजिंग ही संपूर्णतः भारतीय बनावटीचे असेल अस ती सांगते.
किचकट गणित ते यशस्वी उद्योजिका
मानसीने कॉलेज सुरू असताना सुरू केलेल्या या व्यवसायाच तिला संपूर्ण ज्ञान अजिबात नव्हत. केवळ अनुभव, जिद्द, चिकाटी या जोरावर ती हे शक्य करू शकली अस ती सांगते. कागदी पॅकेजिंग पासून आकर्षक सुंदर अशी पॅकेजिंग सुंदर वेबसाईट सगळ आकार घेण्यासाठी अनुभव, मध्ये झालेली धडपड, पडझड कामात आली अस ती सांगते. या व्यवसायात आजही काचेच्या बाटली मध्ये पॅकेजिंग दिली जाते. त्यामुळे ते डिलिव्हरी मध्ये त्या बाटल्या फुटून पदरीचे पैसे द्यावे लागतात. मात्र पॅकेजिंग, डिलिव्हरी, विविध व्यवहार, टेस्टिंग या साऱ्या तारेवरच्या किचकट कसरती आपल्याला खूप शिकवतात. आणि या क्षेत्राचा अनुभव नसतानाही यशस्वी स्त्री उद्योजिका म्हणून उभ करतात . त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आणि वेळोवेळी संघर्ष करण्याची तयारी असावी अस मानसी सांगते. माझ्या या संपूर्ण प्रवासात आई, बाबा आणि बहिणीने मदत केल्याचं मानसी प्रतिपादन करते.